उर्दू पदविका परीक्षेत ३७ विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:24 AM2019-10-16T01:24:00+5:302019-10-16T01:25:02+5:30
शहरात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उर्दू व अरेबिक भाषा विकास उपक्रमांतर्गत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली गेली. या दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू अभ्यासक्रमात केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. मोहन पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच अरेबिक भाषेत फरहत सय्यद यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
नाशिक : शहरात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उर्दू व अरेबिक भाषा विकास उपक्रमांतर्गत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली गेली. या दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू अभ्यासक्रमात केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. मोहन पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच अरेबिक भाषेत फरहत सय्यद यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
सारडासर्कल येथील नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात उर्दू-अरेबिक भाषांच्या पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाची अभिरूची दिवसेंदिवस बीगर उर्दू-अरेबिक भाषिक वर्गातील नागरिकांमध्येही वाढू लागली आहे. मागील वर्षी उर्दूमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता. नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन आॅफ उर्दू लॅँग्वेजकडून एप्रिल-२०१९मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत उर्दूसाठी ३७, तर अरेबिक भाषेसाठी १६ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याने दोन्ही भाषांच्या पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती प्रा.जाहिद शेख यांनी दिली.
उर्दू भाषेच्या परीक्षेत फारूख बागवान यांनी द्वितीय व शरद पगारे यांनी तृतीय क्रमांक राखला. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणधिकारी अनिल शहारे, माजी विस्तार अधिकारी भीमराव गरड, रश्मी काळोखे, अॅड. आसीम शेख, गौरव देशमुख, डॉ. सतीश करंदीकर आदींनी विशेष प्रावीण्यात यश मिळविले. अरेबिक पदविका अभ्यासक्रमात राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी हसन सय्यद यांनी प्रथम, तर आरीफ अब्दुल कादर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. उर्दूचे धडे जमीर पठाण व अरेबिक भाषेचे धडे मौलाना युनूस सकाफी यांनी परीक्षार्थींना दिले.