नाशिकमध्ये 4 वाहनांचा विचित्र अपघात; आगीत दोघे गंभीरपणे भाजले, 7 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 01:27 AM2019-09-15T01:27:06+5:302019-09-15T01:27:12+5:30
नाशिक-शिर्डी महामार्गावर शनिवारी (दि.14) सायंकाळी सिन्नरजवळ 4 वाहनांचा विचित्र अपघात घडला.
नाशिक : नाशिक-शिर्डी महामार्गावर शनिवारी (दि.14) सायंकाळी सिन्नरजवळ 4 वाहनांचा विचित्र अपघात घडला. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली; मात्र अपघातानंतर पेटलेल्या रिक्षामधील (एम.एच15 एफयू 3950) एक पुरुष व वृद्धा गंभीरपणे भाजले. स्थानिक युवकांनी त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रिक्षामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. घटनास्थळी आलेल्या सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या पेटलेल्या रिक्षामधील प्रवाशांना बाहेर काढून त्वरीत रुग्णवाहिकेने रुग्णालयात उपचारासाठी हलविले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. या अपघातात एकूण 7 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, आडवाफाटा येथे दोन दुचाकी, आयशर ट्रक व रिक्षा मध्ये विचित्र अपघात घडला.
माळेगाव एमआयडीसी कडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाच्या पुढे अचानक दुचाकीस्वार आल्यामुळे रिक्षाचालकाने अपघात टाळण्यासाठी ब्रेक दाबला असता पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आयशर ने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाने पाठीमागून अचानक पेट घेतला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार, रिक्षाचालक, रिक्षामधील 4प्रवाशी गंभीर रित्या जखमी झालेत. रिक्षा ने पेट घेतल्याने रिक्षा मधील एक इसम अन वयोवृद्ध महिला मोठ्या प्रमाणात होरपळले आहेत.
जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत, पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत.