‘नाशिक मध्य’ मतदारसंघामध्ये अंतिम ३ तासांत ३० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:23 AM2019-10-22T01:23:37+5:302019-10-22T01:24:25+5:30

Maharashtra Assembly Election 2019 नाशिकच्या विविध क्षेत्रांतील वरिष्ठ नेत्यांचा रहिवास असलेल्या नाशिक ‘मध्य’ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत २५ टक्क्यांपेक्षा कमी असलेले मतदान त्यानंतरच्या तीन तासांत थेट ५५ टक्क्यांवर पोहोचले. किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता संपूर्ण मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

 4% voting in last 3 hours in Nashik Central constituency | ‘नाशिक मध्य’ मतदारसंघामध्ये अंतिम ३ तासांत ३० टक्के मतदान

‘नाशिक मध्य’ मतदारसंघामध्ये अंतिम ३ तासांत ३० टक्के मतदान

Next

नाशिक : नाशिकच्या विविध क्षेत्रांतील वरिष्ठ नेत्यांचा रहिवास असलेल्या नाशिक ‘मध्य’ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत २५ टक्क्यांपेक्षा कमी असलेले मतदान त्यानंतरच्या तीन तासांत थेट ५५ टक्क्यांवर पोहोचले. किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता संपूर्ण मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
नाशिक मध्य मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीतही मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नव्हता. त्याप्रमाणेच सोमवारी सकाळपासून ढगाळ हवामान आणि तुरळक पाऊस पडल्याने मतदानाचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत कमीच होते. सकाळच्या वेळी प्रारंभी मध्यच्या अन्य भागांपेक्षा गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड, त्र्यंबकरोड, इंदिरानगर परिसरात अन्य भागांपेक्षा काही प्रमाणात अधिक मतदान झाले. मात्र दिवसाच्या पूर्वार्धात अन्य मतदार केंद्रांवर हे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर तर वीस टक्के मतदानदेखील झाले नसल्याचे चित्र दिसून आले. त्यावेळी सरासरी मतदान हे १९.३४ टक्के झाले. मात्र दुपारनंतर ढगाळ हवामान जाऊन ऊन पडल्यावर मतदारांच्या प्रमाणात थोडीफार वाढ होऊ लागली. मतदारसंघातील आमदार प्रा. देवयानी फरांदे, डॉ. हेमलता पाटील आणि नितीन भोसले हे तिन्ही प्रमुख उमेदवार प्रमुख मतदार केंद्रांबाहेर जाऊन मतदानप्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची खात्री करून घेत होते. मात्र, बहुतांश मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा नसल्याचे चित्र होते. त्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता दिसू लागताच उमेदवारांचे पदाधिकारी झटून कामाला लागले. दुपारी ३ नंतर झोपडपट्टीनजीकच्या मतदानकेंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत हे मतदान सुरू राहिल्याने मतदानाचा टक्का अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढला. अवघ्या तीन तासांत ३० टक्के मतदान झाल्याने नाशिक मध्य विधानसभा क्षेत्रात ५५.८० टक्के मतदानाचा आकडा गाठला गेला.
वाघ गुरुजी शाळेत शाब्दिक चकमक
गंगापूररोड परिसरातील वाघ गुरुजी शाळा मतदान केंद्राच्या परिसरात मनसेचे उमेदवार नितीन भोसले हे काही कार्यकर्त्यांसमवेत उभे होते. मतदान केंद्रात येणाऱ्या नागरिकांशीदेखील ते संवाद साधत असल्याचे पाहून आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी त्यांच्या उपस्थितीबाबत तसेच गळ्यात मनसेच्या उपरणाबाबत आक्षेप घेतला. त्यावर काही क्षण दोन्ही उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, भोसले यांनी त्यांचे उपरणे काढून कार्यकर्त्याकडे सोपविल्यावर वाददेखील संपुष्टात आला.

Web Title:  4% voting in last 3 hours in Nashik Central constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.