४० वैमानिक देशसेवेत ; ‘कॅट्स’च्या ३०व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:43 AM2018-11-11T00:43:52+5:302018-11-11T00:44:37+5:30
भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१०) दाखल झाली. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच भारतीय भूदल सेना व नौसेनेतील एकूण तीन अधिकाºयांना ‘एव्हिएशन प्रशिक्षक बॅच’ देऊन सन्मान करण्यात आला.
नाशिक : भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१०) दाखल झाली. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच भारतीय भूदल सेना व नौसेनेतील एकूण तीन अधिकाºयांना ‘एव्हिएशन प्रशिक्षक बॅच’ देऊन सन्मान करण्यात आला.
गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ३०व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने ४० वैमानिक देशसेवेसाठी विविध ठिकाणी सेवा देण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, भारतीय भूदलातून दोन, तर भारतीय नौसेनेमधील एक अशा तीन अधिकाºयांनी लढाऊ हेलिकॉप्टरचालन प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल भल्ला यांनी या अधिकाºयांना प्रशिक्षकपदाचा ‘बॅच’ प्रदान करून गौरव केला.
युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सुमारे वर्षभराच्या कालावधीत या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी लष्करी थाटात ४० वैमानिकांसह तीन प्रशिक्षकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देण्यात आले.
‘आॅपरेशन विजय’ : अंगावर आले शहारे
युद्धजन्य परिस्थितीमध्ये भूदलातील जवानांना महत्त्वाची मदत पोहोचविण्याकरिता लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची असलेली भूमिका ‘आॅपरेशन विजय’द्वारे प्रात्यक्षिकांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न ‘कॅट्स’कडून करण्यात आला. ‘आॅपरेशन विजय’ची झलक उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारी ठरली. चित्ता हेलिकॉप्टरमधून तत्काळ सैनिकांना रसदचा पुरवठा केला जातो आणि सैनिक शत्रूच्या तळांवर हल्ला चढवितात. अल्पवधीत शत्रूवर विजय मिळवून सैनिक आनंदाने तिरंगा फडकावून सलामी देतात. या आॅपरेशनमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’च्या साह्याने सुरक्षितरीत्या युद्धभूमीवरून हलविले जाते.
सुरक्षित उड्डाण हेच उत्कृष्ट वैमानिकाचे ध्येय
धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी होतो. एव्हिएशन स्कूलच्या उत्तम व्यासपीठावरून तुम्ही राष्टसेवेत दाखल झाले आहात त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण कामगिरीवर भर द्या, असा गुरुमंत्र सरबजितसिंग भल्ला यांनी यावेळी दिला. सुरक्षित उड्डाण करत लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कारकिर्दीत करावा. शारीरिक व मानसिक आरोग्य एका उत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकासाठी आवश्यक ठरते हे विसरू नये, असेही ते म्हणाले.