शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:29+5:302021-05-12T04:15:29+5:30
शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वानुमते बारा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय ...
शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वानुमते बारा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत नाशिककरांना आवाहन करत लॉकडाऊन यशस्वी करण्याची साद घातली आहे. दरम्यान, अंशत: लॉकडाऊन काळात नियमांच्या अंमलबजावणीत असलेली शिथिलता आता दिसणार नसून, नियम आणि अंमलबजावणी कठोर करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोठेही कोणत्याही कारणास्तव नागरिकांची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्स धोक्यात येणार नाही, यासाठी चोख नियोजन करण्याचा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिला आहे. शहरात ४० नाकाबंदी पाइंटस् लावण्यात आले आहेत. ही संख्या मोठी असून, नाकाबंदीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. यापूर्वी शहरात नाकाबंदी पॉइंटस् होते. मात्र, येथे नागरिकांना अडविण्यात येत नव्हते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी चौकशी, कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात झाली. बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर मात्र कोणतीही सूट मिळणार नाही. नागरिकांना नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांवर चोख बंदोबस्त व नाकाबंदीची भिस्त पांडेय यांनी सोपविली आहे.