जिल्ह्यात ४० बालकांनी गमावले आई-वडील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:39+5:302021-05-26T04:14:39+5:30
अनाथ व निराधार झालेल्या बालकांची माहिती गोळा करण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, त्यासाठी चाईल्डलाईन, महिला ...
अनाथ व निराधार झालेल्या बालकांची माहिती गोळा करण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, त्यासाठी चाईल्डलाईन, महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच जिल्हास्तरीय कृती दल अशा विविध संस्थांमार्फत हेल्पलाईन सुरू करून अनाथ झालेल्या बालकांची माहिती गोळा केली जात आहे. प्राथमिक पातळीवर गेल्या आठ दिवसात ४० बालकांची माहिती संकलित झाली असून, अशा बालकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. ज्या बालकांना आई-वडील नाहीत व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे येणार नाही अशांसाठी शिशुगृह व बालगृहे सुरू करण्यात आले आहेत.
---------------
अगोदर नातेवाईकांना विचारपूस, नंतर घेणार बालकांचा ताबा
* कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या नजिकच्या आजी-बाबा, काका, मामा यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
* आई व वडील अशा दोघांना गमावलेल्या बालकांचा ताबा जिल्हा बालकल्याण समिती घेणार. अशा बालकांना शिशुगृह, बालगृहात दाखल करण्यात येणार आहे.
* शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांचे संगोपन करण्यात येणार आहे. त्यात कोणतीही आर्थिक मदतीची तरतूद नाही.
--------------
४० कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या
-------------
अनाथ बालकांचे सरकार करणार काय
१ आई-वडील असे दोघे गमावलेल्या बालकांचे संगोपन करण्यास कोणी नातेवाईक पुढे न आल्यास त्यांचा ताबा सरकार घेणार.
२) आई किंवा वडील यापैकी एकाला गमावलेल्या बालकाचे संगोपन करण्यास नातेवाईक असल्यास अशा बालकाचा शैक्षणिक खर्च सरकार उचलणार.
३) वयाच्या अठरा वर्षापर्यंत अशा निराधार व अनाथ बालकांच्या संगोपनाची जबाबदारी शासनाकडे असणार आहे.
--------------
बाल संगोपनाला प्राधान्य
कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांचे जिल्हा बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली संगोपन व पुनर्वसन करण्यात येणार असून, अशा बालकांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.
- सुरेखा पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी