नाशिक जिल्ह्यात तीन वर्षांत ४० बिबटे मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:31 AM2018-11-27T00:31:44+5:302018-11-27T00:32:09+5:30
विविध नद्यांची खोरे, सह्याद्री पर्वतरांगेतील गड-किल्ले व शेतीचे बागायती क्षेत्र यामुळे नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीदेखील त्यांचे मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या तीन वर्षांमध्ये तब्बल ४० बिबटे मृत्युमुखी पडल्याची नोंद वनविभागाच्या दफ्तरी आहे.
नाशिक : विविध नद्यांची खोरे, सह्याद्री पर्वतरांगेतील गड-किल्ले व शेतीचे बागायती क्षेत्र यामुळे नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीदेखील त्यांचे मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या तीन वर्षांमध्ये तब्बल ४० बिबटे मृत्युमुखी पडल्याची नोंद वनविभागाच्या दफ्तरी आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वाढता अधिवास शुभवर्तमान मानले जात आहे. घाटनदेवीसह इगतपुरी तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे या भागात बिबट्यांचा अधिवास आढळतो. तसेच त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, निफाड, सिन्नर या तालुक्यांमध्येही बिबटे आढळून येतात. या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्टÑीय महामार्गांवर बिबटे अपघातात ठार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. २०१६ ते २०१८ या वर्षांमध्ये (आॅक्टोबरपर्यंत) तब्बल ४० बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये २०१६ पर्यंत नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू होण्याच्या घटना कमी होत्या; मात्र त्यानंतर यामध्येही वाढ झाली. चालू वर्षी सात बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर या तीन वर्षांत नैसर्गिक कारणांमुळे १४ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. २०१६-१७ या दोन वर्षांत रस्ते अपघातात प्रत्येकी ४ तर यावर्षी आतापर्यंत तीन असे एकूण ११ बिबट्यांना रस्त्यावरील अपघातात जीव गमवावा लागला आहे. २०१६ पासून बिबट्यांची शिकार झाल्याची नोंद नव्हती. यावर्षी एका बिबट्याची शिकार करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
अशी आहेत मृत्यूची कारणे
विहिरीत पडून, रस्ते अपघात, आजारपण, नैसर्गिक, शिकार या कारणांमुळे बिबट्यांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाने केली आहे. तसेच बिबट्यांचे पिल्लंदेखील कुत्र्यांच्या हल्ल्यात दगावतात. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या विहिरींचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. तसेच शेतकºयांनी विहिरींवर संरक्षक जाळ्यादेखील बसविलेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करताना बिबटे विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. विहिरींमध्ये सुरक्षित आधार सापडल्यास काही बिबट्यांना जिवंत बाहेर काढण्यासही वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले आहे.
शिका-यांची जिल्ह्यावर वक्रदृष्टी
बिबट्यांची शिकार नाशिक जिल्ह्यात याअगोदर कधी झाल्याची नोंद वनविभागाकडे होऊ शकलेली नाही; मात्र यावर्षी एक बिबट्याची शिकार जिल्ह्याच्या हद्दीत झाली. त्यामुळे वनविभागापुढे आता शिकाºयांचे आव्हान उभे राहिले आहे. नाशिक जिल्हा बिबट्यांचे माहेरघर बनू पाहत असताना शिकाºयांनी केलेली वक्रदृष्टी त्यास मारक ठरणारी आहे. वनविभागाने शिकाºयांपासून वन्यजीव कायद्यांतर्गत बिबट्यांना संरक्षण देण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.