गिरणा धरणाचा जलसाठा चाळीस टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:03 AM2018-08-23T01:03:47+5:302018-08-23T01:04:53+5:30
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
साकोरा : नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यातच चणकापूर, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे पाणी गिरणा धरणात येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस असलेला धरणाचा जलसाठा नऊ टक्यांवरून चाळीस टक्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील मुख्यत: अवलंबून असलेल्या १३५ गावांबरोबरच चाळीसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याबरोबरच काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्नही सुटण्यास आता मदत होणार आहे.
गिरणा धरण नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असले तरी याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होत असतो. या धरणात किमान तीस टक्के जलसाठा असल्यास यावर विसंबून असलेल्या जळगाव जिल्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असतो. याशिवाय या धरणावर मालेगाव महानगरपालिका, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, दहीवाळ पाणीपुरवठा योजना यांच्यासह धरण परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर या तालुक्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून राहावे लागत असल्याने आज तरी तूर्तास पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे बोलले जात आहे.
जलसिंचनामुळे फायदे मिळविणारे तालुके
चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर, मालेगाव, धुळे
कालव्याच्या कक्षेत येणारे क्षेत्र - २,६३,३७७ एकर
जलसिंचनाखाली येणारे क्षेत्र - १,४१,३६४ एकर
कालव्याची लांबी
अ) वसंतदादा पाटील कालवा - ५३, २० किमी
ब) जामदा डावा कालवा - ५६, ३० किमी
क) जामदा उजवा कालवा - ३३,१९ किमी
ड) निम्न गिरणा - ४५, ०६ किमी