गुळवंच येथील चारा छावणीत ४०० जनावरांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:07 PM2019-05-19T18:07:54+5:302019-05-19T18:08:23+5:30
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथील चारा छावणीत पाच दिवसाच्या कालावधीत ४०० च्या आसपास लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. चारा छावणीमध्ये दाखल झालेल्या मोठ्या पशुधनासाठी १८ किलोग्रॅम तर लहान पशुधनासाठी ९ किलोग्रॅम असा हिरवा चारा दिला जात आहे.
तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी चारा छावणी सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून केली होती. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पहिली चारा छावणी गुळवंच येथील ग्रामविकास फाउंडेशनने ६ हेक्टर जागेत सुरू केली आहे. पहिल्या दिवशी चारा छावणीत ७० पेक्षा अधिक लहान व मोठी जनावरे दाखल झाली होती. दुसºया दिवशी जिल्हाचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी गुळवंच येथील चारा छावणीला भेट देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.दरम्यान आमदार राजाभाऊ वाजे यांनी चारा छावणीस भेट देवून जनावरांची काळजी घेण्याच्या सुचना छावणीसंचालक व शेतकºयांना दिल्या. स्थानिक व परिसरातील शेतकºयांनी गायी, बैल छावणीत दाखल केले आहेत. जनावरांसाठी मका, ऊस असा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी आमदार वाजे यांनी छावणीची पाहणी केली. वेळेत चारा व पाण्याची व्यवस्था करावी, आवश्यकता भासल्यास पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून जनावरांची तपासणी करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. गुळवंच येथील चारा छावणीत पाचव्या दिवशी सांयकाळपर्यंत गाय, बैल, पारडू असे एकूण ४०० च्यावर जनावरे दाखल झाली आहेत. यावेळी शिवसेना युवा नेते उदय सांगळे, पंचायत समिती सदस्य रोहिणी कांगणे, भगवान सानप, सरपंच कविता सानप, ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू सानप, समाधान सानप आदींसह पशुपालक उपस्थित होते.