४१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By Admin | Published: May 30, 2017 12:11 AM2017-05-30T00:11:05+5:302017-05-30T00:11:25+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास सोमवारी (दि.२९) झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, कपात करण्यात आलेल्या विभागांमध्ये प्रामुख्याने बांधकाम, लघुपाटबंधारे व कृषी विभागातील योजनांचा समावेश आहे. मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी असलेली पाच लाखांची तरतूद वाढवून २० लाख करण्यात आली, तर ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी असलेली चारचाकी वाहन खरेदी योजना याही वर्षी धरण्यात येऊन त्यात एक कोटींनी वाढ करून या योजनेसाठी दोन कोटींचा निधी ठेवण्यात आला. पदाधिकारी व अधिकारी निवासस्थान व कार्यालय दुरुस्तीवरील धरण्यात आलेल्या एकूण तरतुदीत एक ते दीड कोटींनी कपात करण्यात येऊन हा निधी रस्ते व बंधारे दुरुस्तीसाठी तीन लाखांनी वाढविण्यात आला.
अध्यक्षस्थानी शीतल उदय सांगळे होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, सभापती अर्पणा खोसकर, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज वितरणाचा आढावा घेण्यात आला. कंपनीकडील असलेल्या तक्रारींचा ओघ पाहून स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात मुद्रांक, वाहन व व्यवसाय करापोटी एकूण २७ कोटी ६१ लाख जमा होणार असल्याचे स्पष्ट केले. एकूण जमेच्या बाजू धरून ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२चा अर्थसंकल्प सादर केला. खर्चाच्या बाजू मांडताना डॉ. कुंभार्डे, धनराज महाले, बाळासाहेब क्षीरसागर, यतिन पगार, नितीन पवार, उदय जाधव, भास्कर गावित, हिरामण खोसकर यांनी अधिकारी निवासस्थान तसेच कार्यालय दुरुस्तीसाठीच्या एक कोटी ३० लाखांपैकी ६५ लाखांच्या खर्चात कपात करून निधी सेसकडे वळविला.
जाधव-गावित खडाजंगी
च्कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमधून राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांनी कपाती सूचविल्यानंतर उपाध्यक्ष नयना गावित व उदय जाधव यांच्यात खडाजंगी झाली. या योजनांसाठी राज्यस्तरावरून निधी येत असल्याने त्यासाठीची तरतूद रद्द करावे, असे जाधव यांचे म्हणणे होते, तर योजनांमध्ये तुम्ही कपात सुचवून शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे उपाध्यक्ष नयना गावित यांचे म्हणणे होते.