शहरात आढळले डेंग्यूचे ४१ रुग्ण
By admin | Published: October 18, 2014 12:32 AM2014-10-18T00:32:56+5:302014-10-18T00:33:11+5:30
रोगराई : पंधरा दिवसांत आढळले १२४ संशयित रुग्ण
नाशिक : शहरात रोगराई सुरूच असून, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ४१ डेंग्यू रुग्ण आढळले असून, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पालिकेला अद्याप डेंग्यू रोखण्यात यश आलेले नाही.
चालू वर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. चालू महिन्यात म्हणजेच १ ते १६ आॅक्टोबरपर्यंत पालिकेच्या वैद्यकीय अहवालानुसार एकूण १२४ संशयित रुग्ण आढळले होते. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७७ अहवाल प्राप्त झाले असून, त्यानुसार ४४ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्थात, यापैकी ३३ रुग्णच पालिकेच्या हद्दीमधील असून, उर्वरित रुग्ण पालिका हद्दीबाहेरील आहेत, असे पालिकेचे म्हणणे आहे. गेल्या महिनाभरापर्यंत सुमारे ७० रुग्ण आढळले होते; परंतु राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येचा विचार
केला तर नाशिक महापालिकेचा क्रमांक २३ वा आहे. सुमारे अडीचशे रुग्ण असलेली पुणे महापालिका अव्वल असल्याचे सांगण्यात आले होते.
महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षात घेण्याची गरज असताना ती घेतली नाही. डास निर्मूलनासाठी औषध फवारणी आणि धुरळणीचे काम करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपण्याच्या आधी पालिकेने नूतन ठेकेदार नियुक्त करण्याची गरज असतानादेखील पालिकेने योग्य वेळी प्रक्रिया राबविली नाही. परिणामी, जुन्याच ठेकेदाराला तब्बल सात वेळा मुदतवाढ द्यावी लागली आहे. (प्रतिनिधी)