४१ विद्यार्थी उत्तीर्ण : उर्दू पदविका परिक्षेत उपआयुक्त सुनील कडासने प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:21 PM2018-12-15T16:21:29+5:302018-12-15T16:23:51+5:30
राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परिक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली तर अरबी भाषेच्या परिक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
नाशिक : प्रत्येक भाषा आणि तिचे वैशिष्ट्ये वेगवेगळी आहे. भाषा ही स्वतंत्र असते तिचा कुठल्याही जातीधर्माशी अथवा पंथाशी संबंध नसतो. तिचे आपले एक वेगळेच अस्तित्व असते. त्यामुळे कोणीही कोणत्याही भाषेच्या प्रेमात पडू शकतो. राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परिक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली तर अरबी भाषेच्या परिक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उर्दू पदविका परिक्षेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
अलिकडे दुर्दैवाने भाषेलाही राजकारणात ओढले जाते. आपल्या मातृभाषेसोबत अन्य भाषांचे ज्ञान असणे हे नेहमीच चांगले असते. त्यामुळे व्यापक विचारदृष्टी ठेवणाºया काही व्यक्तींकडून अन्य भाषेचे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न होत असतो. सारडा सर्कलवरील नॅशनल उर्दू हायस्कूलला उर्दू भाषा पदविका अभ्यासक्रम केंद्राची मान्यता प्राप्त आहे. यावर्षी हा अभ्यासक्रम एकूण ९० विद्यार्थी शिकत होते. त्यापैकी ५३ विद्यार्थी हे इस्लाम धर्मीय नव्हते, अशी माहिती संस्थेचे सचिव जाहिद शेख यांनी दिली. त्यापैकी ४१ उमेदवारांनी उर्दू पदविका अभ्यासक्रम परिक्षा उत्तीर्ण केली आहे. यामध्ये कडासने यांनी ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर स्वानंद राजपूत (७९ टक्के), अब्दूल रहेमान शेख (७८ टक्के) गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अरेबिक पदविका परिक्षेत हमीदोद्दीन शेख यांनी ९५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच साजीद शेख, मुहम्मद अतिक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष हाजी बबलु पठाण, सहसचिव एजाज काझी, प्राध्यापक जमीर पठाण, मौलाना युनुस खान आदि उपस्थित होते. नवीन वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहे.
१४वर्षांपासून पदविका अभ्यासक्रम
नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात चालविल्या जाणा-या या केंद्रात मागील १४ वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांनी उर्दू, अरेबिक भाषेचे धडे गिरविले आहे. यामध्ये बिगर उर्दू भाषिकांचा समावेश अधिक आहे. केवळ उर्दू शिकली नाही तर ती बोलणे, लिहिण्याचेही ज्ञान उमेदवारांनी आत्मसात केले. अभ्यासक्रमासाठी लागणारी पाठ्यपुस्तके मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मोफत पुरविली जातात. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी उर्दू-अरेबिक भाषेचे ज्ञान घेतले आहे.