४१२ जवान तोफखान्यात : मैं सच्चे मन से देशसेवा करूंगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:15 PM2019-09-07T18:15:52+5:302019-09-07T18:18:16+5:30
तोफखाना केंद्राचे ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. ‘तोपची’च्या या तुकडीचा मला गर्व आहे. मला विश्वास आहे....
नाशिक : ‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा, और मैं अपने कर्तव्य के अनुसार ईमानदारी और सच्चे मन से देशसेवा करूंगा...’ अशी शपथ आत्मविश्वासाने घेत भारतीय तोफखान्याच्या ४१२ जवानांनी (गनर) सशस्त्र संचलन करत स्वत:ला देशसेवेसाठी सिद्ध केले.
निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे. शनिवारी (दि.७) केंद्राच्या संचलन मैदानावर वरूणराजाच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा लष्करी थाटात पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित मुख्य अतिथी तथा वरिष्ठ अधिकारी सेना पदक विजेते मेजर जनरल संजय थापा, कमान्डंट ब्रिगेडियर जे.एस.गोराया यांना मानवंदना दिली. युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणा-या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे कार्यान्वित आहे. शपथविधी सोहळ्याचे समीक्षण मेजर जनरल संजय थापा यांनी केले.
केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी थापा म्हणाले, आपल्या पूर्ण कारकिर्दीत आजचा दिवस सदैव स्मरणात ठेवावा.तोफखाना केंद्राचे ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. ‘तोपची’च्या या तुकडीचा मला गर्व आहे. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व सैनिक आपली जबाबदारी चोखपणे बजावून केंद्राचे नाव उज्ज्वल करतील. सैनिकाने आपला सैनिक धर्म व सैनिकी शिस्त कधीही विसरता कामा नये, असा गुरूमंत्रही दिला. तोफखाना दल भारतीय सेनेचा पाठीचा कणा आहे. त्यामुळे या दलात सहभागी होऊन भारतीय सेनेचा भाग होता आले, याचा प्रत्येक जवानाने अभिमान बाळगावा, असेही थापा यावेळी म्हणाले.
यांचा झाला विशेष गौरव
परेड कमांडर सौरव परिहार, अष्टपैलू गनर राहूल कुमार, निकू मनी दास, हिमांशु यादव, अंकित चौरसिया, रणधिर कुमार शर्मा, पुनीत यादव, सावंत अक्षय यांनी ४४ आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत विविध विषयांमध्ये प्राविण्य मिळवून उत्कृ ष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा मान मिळविला. त्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह यावेळी प्रदान करण्यात आले.माता-पित्यांना ‘गौरव पदक’
नवसैनिकांच्या नातेवाइकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा येथील हिरवळीवर रंगला. यावेळी माता-पित्यांसह आजी-आजोबांनी नवसैनिकांना जवळ घेत मायेचा हात फिरवून चांगल्या भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. लष्करी अधिकाऱ्यांनी माता-पित्यांना सन्मानपूर्वक ‘गौरव पदक’ प्रदान केले. यावेळी अनेकांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते.