४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:50 AM2018-11-12T01:50:02+5:302018-11-12T01:51:26+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.

42 Khedi water supply scheme starts at the end | ४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतींना निधी उपलब्ध वीज वितरण कंपनीने दाखविली संवेदनशीलता

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. या प्रकरणी वीज वितरण कंपनीनेदेखील संवेदनशीलता दाखविल्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यास मदत झाली.
जिल्हा परिषदेने जिल्हा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीमधून १३ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज वितरण कंपनीकडून याकामी पुढाकार घेण्यात आल्याने ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून थकीत बिलामुळे या योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला योजना सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तत्काळ बैठक आयोजित केली होती. यामध्ये वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पाणीपुरवठा योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांना बोलाविण्यात आले होते. डॉ. गिते यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चालू वीजबिल तसेच मागील थकीत बिलाही रक्कम कमी करून ११ लाख ८० हजार देयक भरून वीज जोडण्याची सूचना वीज वितरण विभागास केली होती. वीज वितरण विभागानेही सकारात्मक भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून ही योजना पूर्ववत सुरू झाली आहे. नाग्यासाक्या धरणातून सदरचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा विभागाला सूचना
४२ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील देखभाल दुरु स्तीमधून वीज देयक भरण्यासाठी साडेसात लाख, तर देखभाल दुरु स्तीसाठी साडेपाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, वीज वितरण विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयाने ही योजना सुरू करण्यात यश आले आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात अशाप्रकारे थकीत वीजबिलामुळे कोणतीही योजना बंद पडणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 42 Khedi water supply scheme starts at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.