गणेशोत्सव मंडळांसाठी पोलिसांचे ४२ नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:52 PM2017-08-11T23:52:30+5:302017-08-18T14:59:18+5:30
आगामी गणेशोत्सव काळात शहरात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शांततेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासनाने ४२ नियम व सूचनांची नियमावली तयार केली आहे.
नाशिक : आगामी गणेशोत्सव काळात शहरात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शांततेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासनाने ४२ नियम व सूचनांची नियमावली तयार केली आहे. येत्या २५ आॅगस्टपासून सुरू होणारा गणेशोत्सव तसेच ५ सप्टेंबर रोजी साजरी होणारी बकरी ईदनिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहर पोलीस शांतता समितीची बैठक भद्रकाली पोलीस ठाण्यात घेण्यात आली. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय मगर, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, अजय देवरे, विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, सुनील नंदवाळकर, आनंदा वाघ, महापालिका, अग्निशामक, महावितरण कंपनीचे विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान, जुने नाशिकसह परिसरात जुने १०५ गणेश मंडळ, गोपालकाला मित्रमंडळांसह बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विविध मुस्लीम धर्मगुरू, धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव काळात तसेच ईदच्या दरम्यान भेडसावणाºया समस्या मंडळांच्या पदाधिकाºयांनी निदर्शनास आणून दिल्या. समस्यांनुसार संबंधितांनी नोंद करून घेत समस्या उद्भवणार नाही, याबाबत आश्वासन दिले. दरम्यान, पाटील यांनी गणेशोत्सव, बकरी ईद, गोपालकाला हे सर्व सण उत्सव पारंपरिक पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचे पालन करीत साजरे करण्याचे आवाहन केले. सण-उत्सव काळात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, कुठे काही अवैध प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सण-उत्सव काळात कुठल्याही प्रकारे शहरासह उपनगरीय भागात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्तींची हालचाल दिसून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
नियमावलीमधील काही नियम असे.
प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा.
गणरायाची स्थापना करण्यापूर्वी मनपा, पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी.
गणेश मंडळाच्या जागेत धार्मिक कार्याव्यतिरिक्त कुठलेही गैरकृत्य करू नये.
उभारले जाणारे मंडप व त्यांचा आकार मर्यादित स्वरूपाचा असावा.
मिरवणुकीसाठी ध्वनिक्षेपकाची परवानगी पोलिसांकडून मिळवावी.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
ध्वनिक्षेपक, वाद्य रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत बंद ठेवावे. डीजेचा वापर टाळावा.