४६ लाख रुपये कंपनीला मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:13 AM2018-07-19T01:13:34+5:302018-07-19T01:14:14+5:30
नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेच्या कामगिरीमुळे आॅनलाइन फसवणूक झालेल्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील कंपनीची ४६ लाखांची रक्कम कंपनीला परत मिळाली आहे़ याबाबत कंपनीने ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व सायबर शाखेचे आभार मानले आहेत़
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील हायटेक ई़डी़एम़ या कंपनीने चीनमधील सुझोऊ लिस्ट्राँग मेकॅनिकल अॅण्ड इलेक्ट्रिकल कंपनीकडून ०४ ईडीएम वायर मशीन खरेदीसाठी आॅनलाइन पद्धतीने एस बँकेद्वारे पैसे देण्यात येणार होते़ या व्यवहारासाठी चीनमधील कंपनीने बँक अकाउंट नंबरही ई-मेलद्वारे कळविला होता़ यानंतर २७ जून २०१८ रोजी अज्ञात इसमांनी चीनमधील कंपनीची बनावट ई-मेल आयडी तयार करून त्याद्वारे दुसरे अकाउंट नंबर देऊन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले़ त्यानुसार जानोरीतील कंपनीच्या संचालकांनी बँक खात्यावर ४६ लाख ७७ हजार ३६ रुपये आॅनलाइन पद्धतीने ट्रान्सफर केले होते़
चीनमधील कंपनीस पैसे देऊनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने शंका आल्याने त्यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे संचालकांच्या लक्षात आले़ याबाबत ४ जुलै २०१८ रोजी नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या आॅनलाइन फसवणुकीची सविस्तर माहिती घेतली़ यानंतर यस बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून आॅनलाइन पेमेंट थांबविण्याची विनंती केली़ त्यानुसार बँकेने ६ जुलै २०१८ रोजी हा व्यवहार रद्द करून आॅनलाइन ट्रान्सफर केलेली रक्कम पुन्हा जानोरी येथील कंपनीच्या खात्यात वर्ग केली़
सायबर पोलिसांनी जलदगतीने तांत्रिक तपास केल्यामुळेच कंपनीची फसवणूक टळली आहे़ याबाबत कंपनीचे संचालक श्रीकांत शिंदे व पदाधिकाºयांनी पोलीस अधीक्षक व सायबर पोलिसांचे आभार मानले आहे़
अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक करपे, सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार आढाव, महिला पोलीस नाईक सोनाली पाटील, आरती पारधी, पोलीस हवालदार परीक्षित निकम, प्रमोद जाधव, प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आॅनलाइन फसवणुकीत पैसे कंपनीस परत मिळवून दिल्याने अधीक्षक दराडे यांचा सत्कार करताना हायटेक ई़डी़एम़ या कंपनीचे संचालक श्रीकांत शिंदे व सहकारी. कोणतीही बँक अथवा बँकेचे प्रतिनिधी फोन, ई-मेल व वैयक्तिकरीत्या खातेदारास बॅँक अकाउंट व पासवर्डबाबत विचारणा करीत नाहीत़ नागरिकांनी आपले बँक खाते, पासवर्ड वा ओटीपी याबाबतची माहिती देऊ नये़ आॅनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
- संजय दराडे,
ग्रामीण पोलीस अधीक्षक