सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:53 PM2018-11-11T17:53:32+5:302018-11-11T17:54:12+5:30
सिन्नर : येथील सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. १४) पासून आठवडाभर सायंकाळी ६ वाजता दररोज नामवंत व्याख्यातांची व्याख्याने होणार आहेत.
सिन्नर : येथील सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. १४) पासून आठवडाभर सायंकाळी ६ वाजता दररोज नामवंत व्याख्यातांची व्याख्याने होणार आहेत. सप्ताहात साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक अभिरूची संपन्न कार्यक्रम होणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी सांगितले. बुधवारी नाशिकचे अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. विनायक गोविलकर यांचे ‘पैसा की लक्ष्मी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी ‘सिन्नर ऐतिहासिक व सांस्कृतिक ग्रंथदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोविलकर यांच्या हस्ते होणार आहे. ‘स्त्रीविषयक कायदे आणि समाजाची भूमिका’ या विषयी गुरूवार (दि.१५) अॅड. अण्णासाहेब सोनवणे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या ‘मीटू’ मुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि समाज यांच्यावर वस्तूनिष्ठ विवेचन अॅड. सोनवणे करणार आहे. शुक्रवारी (दि.१६) विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने ‘विधीमंडळ कामकाज व असे नेते... असे प्रसंग’ याविषयी रंजक किस्से सांगणार आहेत. शनिवारी (दि.१७) रोजी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ‘नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे काम नेमके कसे असावे, त्यातून जनतेच्या अपेक्षा कशा पूर्ण होतील याचे परखड तितकेच रंजक विवेचन सादर करणार आहेत. मराठी हास्य कलाकार प्रवीण पंडित व नामवंत कलाकार रविवारी (दि. १८) ‘हास्य हंगामा- ४ हा विनोदी कार्यक्रम सादर करणार आहेत. सोमवारी (दि.१९) प्रसिध्द वक्ते स्वानंद बेदरकर ‘शोध बाप-मुलांच्या नात्याचा’ याविषयी व्याख्यान देणार आहेत. कठोर भूमिकेत वावरणाऱ्या बापाचे हळवे अंतरंग व्याख्यानातून उलगडणार आहे. सिन्नरच्या नामवंत उगवता तारा गायक हर्षद गोळेसर व सहकारी मंगळवारी (दि.२०) रोजी ‘भक्तीसंध्या’ कार्यक्रमात अभंग आणि भक्तीगितांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. बुधवारी (दि.२०) सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मुंबईचे अमोल शेवडे ‘सुंदर मी होणार, सुंदर मी जगणार’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. व्यक्तीमत्व आणि जीवन दोन्ही सुंदर असेल तर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडतो. त्यावर मनोगत करणार आहेत. सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, संचालक चंद्रशेखर कोरडे, पी. एल. देशपांडे, मनीष गुजराथी, सागर गुजर, जितेंद्र जगताप, अॅड बीना सांगळे, निर्मला खिंवसरा, सुजाता तेलंग आदींसह संचालक मंडळाने केले आहे.