पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या  ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:49 AM2019-04-23T00:49:16+5:302019-04-23T00:49:34+5:30

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहा दिवसांत केवळ ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अजूनही जवळपास ५३ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

 47 percent of the students who got the opportunity for the first lot | पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या  ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश

पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या  ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश

Next

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहा दिवसांत केवळ ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अजूनही जवळपास ५३ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळू शकलेले नाहीत. यात प्रामुख्याने अर्ज करताना शाळा व घर यातील नोंदवलेले अंतर आणि गुगल मॅपिंगवरील अंतरातील तफावत, खोटे पत्ते, अपूर्ण कागदपत्रे, अर्जांमधील त्रुटी यांसह इतर विविध कारणांमुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे येत आहेत. त्यामुळेच पहिल्या लॉटरीत जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली तरी ११ ते २० एप्रिल या दहा दिवसांत केवळ १ हजार ६६३ प्रवेश झाले आहेत. हे प्रमाण अवघे ४७ टक्के एवढेच असून, पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या ५३ टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर निर्माण झाले आहे.
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी पहिली लॉटरी जाहीर केली होती. त्यात समावेश असलेल्या ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र ११ ते २० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये केवळ १ हजार ६७३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेशासाठी आता फक्त तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उर्वरित ५३ टक्के प्रवेश कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अर्ज बाद
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ४५७ शाळांतील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ९९५ अर्ज आले. ८ एप्रिल रोजी पहिला लकी ड्रॉ काढण्यात येऊन पुढील प्रक्रियेसाठी पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काही पालकांनी खोटे अंतर व कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करत तक्रार केली होती. त्यामुळे खोट्या पत्त्यांच्या आधारे सादर झालेल्या प्रवेश अर्जांची कसून तपासणी केल्यामुळे अनेक अर्ज या प्रक्रियेतून बाद झाले़

गेल्या वर्षी ३० टक्के जागा रिक्त
नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी आरटीईअंतर्गत जिल्ह्यात ४६६ शाळांमध्ये ६ हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज आले होते. एकूण चार प्रवेश फेऱ्यांमध्ये ७ हजार १०८ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली. मात्र, त्यापैकी सुमारे ७० टक्के म्हणजे ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले होते. उर्वरित जवळपास ३९ ते ३० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईच्या क्लिष्ट व दिरंगाईच्या प्रवेश प्रक्रियेमुळे होऊ शकले नव्हते. यावर्षी जिल्ह्यातील ९ शाळांना २० टक्के अनुदान मिळाल्याने त्यांना आरटीई प्रवेशप्रक्रियेतून वगळण्यात आले असून, काही शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्याने आरटीईच्या जागामध्ये घट झाली आहे. यावर्षी आरटीईच्या ५ हजार ७६४ जागा उपलब्ध असून, प्रवेश प्रक्रि येतील दिरंगाईमुळे यावर्षीही प्रवेश कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 

Web Title:  47 percent of the students who got the opportunity for the first lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.