जिल्ह्यात ४७१८ बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:41+5:302021-04-18T04:14:41+5:30
नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या आकड्यातील वाढ शनिवारीदेखील (दि.१७) कायम असून पुन्हा ३८ बळींची नोंद झाली आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या आकड्यातील वाढ शनिवारीदेखील (दि.१७) कायम असून पुन्हा ३८ बळींची नोंद झाली आहे. सातत्याने आठवडाभरापासून बळींची संख्या तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या २८९५ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात जिल्ह्यात सोमवारी बाधित संख्येत ४७१८ ने वाढ झाली असून, एकूण ५३८७ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २४५९, तर नाशिक ग्रामीणला २१९९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ३१ व जिल्हाबाह्य २९ रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १७, ग्रामीणला २०, तर मालेगावला एक असा एकूण ३८ जणांचा बळी गेले आहेत. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने चार हजारांवर रहात असून शनिवारीदेखील ४७१८ बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील सर्वाधिक ३७६७१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात २१ हजार ३५५, नाशिक ग्रामीणला १४ हजार ३०७, मालेगाव मनपाला १७७२, तर जिल्हाबाह्य १३७ रुग्णांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कठोर निर्बंधांपेक्षाही कठोर उपाययोजना अत्यावश्यक असल्याचे बोलले जात आहे.
इन्फो
ग्रामीणचे बळी पुन्हा शहरापेक्षा अधिक
जिल्ह्यातील ३८ बळींपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे २० बळी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदले गेले आहेत. हे बळी शहरातील बळींपेक्षा सातत्याने अधिक येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील बळींचे तांडव सुरू झाल्याने आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागावर पुन्हा अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
इन्फो
प्रलंबित आठ हजारांवर
जिल्ह्यात अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण कायम राहिले आहे. नमुन्यांच्या वाढत्या संख्येने अहवाल कितीही मिळाले तरी प्रलंबितची संख्या फारशी कमी होताना दिसत नाही. शनिवारी ही संख्या ८४९५वर पोहोचली असून, त्यामुळे या पूर्ण आठवड्यात बाधित संख्येत वाढ कायमच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.