जिल्ह्यात बाधित ४,७७२; बळी २५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:03+5:302021-04-05T04:14:03+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा साडेचार हजारांचा आकडा ओलांडून रविवारी (दि.४) एकूण ४,७७२ पर्यंत मजल मारली आहे, तर ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा साडेचार हजारांचा आकडा ओलांडून रविवारी (दि.४) एकूण ४,७७२ पर्यंत मजल मारली आहे, तर आठवडाभराच्या कालावधीत पुन्हा २५ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,४७२ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३,०७२, तर नाशिक ग्रामीणला १,५६५ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७१ व जिल्हाबाह्य ६४ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला ९, तर मालेगावला ४ आणि जिल्हाबाह्य १, असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल पाच हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कठोर निर्बंधापेक्षाही कठोर उपाययोजनेच्या दिशेने सुरू असल्याची जनमानसात चर्चा सुरू आहे.
इन्फो
बळींची वाढती संख्या सर्वाधिक चिंतेचे कारण
जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या बरोबरीने मृत्युदरातही सातत्याने वाढ येऊ लागली आहे. अवघ्या एका आठवड्यात तिसऱ्यांदा पंचवीस बळींचा आकडा गाठला जाणे म्हणजे आठवडाभरात एकूण बळींची संख्या शंभरावर पोहोचण्याची स्थितीच अधिक चिंतेचे कारण ठरत आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालाची संख्या पुन्हा एकदा सहा हजारांवर अर्थात ६,०३९ वर पोहोचली आहे.
इन्फो
उपचारार्थी रुग्णसंख्येचे वाढता- वाढता वाढे
जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३० हजार ४७२ वर पोहोचली आहे. त्यात १८ हजार ०६९ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १०,१७९ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, मालेगाव मनपा क्षेत्रातील १,९९९, तर जिल्हाबाह्य २२५ रुग्णांचा त्यात समावेश आहे.