नायलॉन मांजाचे ४८ रिळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:33+5:302021-01-02T04:12:33+5:30
नायलॉन मांजाचा वापर आगामी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात पतंगबाजीसाठी वाढलेला दिसून येत आहे. यामुळे मुक्या पक्ष्यांसह नागरिकांना या ...
नायलॉन मांजाचा वापर आगामी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात पतंगबाजीसाठी वाढलेला दिसून येत आहे. यामुळे मुक्या पक्ष्यांसह नागरिकांना या मांजाचे ‘घाव’ सहन करावे लागत आहे. द्वारका येथे चार दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वार महिलेचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात चोरट्या मार्गाने होत असलेल्या नायलॉन मांजा विक्री व वापराचा प्रश्न चव्हाट्यावर आला. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-२मधील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक संशयित नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला आहे. नाशिकरोड भागात करण्यात आलेल्या कारवाईत एका मांजा विक्रेत्याच्या ताब्यातून तब्बल ३० रिळ जप्त केले गेले. इंदिरानगर, सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी चार रिळ पोलिसांनी जप्त केले. संबंधित संशयितांविरुध्द कलम-१८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा अथवा काचेचा मांजा वापरु नये तसेच पतंग, मांजा विक्रेत्यांनी आपल्या दुकानाबाहेर ठळकपणे ‘नायलॉन मांजा बंदी’बाबत सूचना फलक लावून नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे टाळावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे खरात यांनी सांगितले.