शिक्षणसंस्थाचालकाकडे पाच कोटींची मागितली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:39 AM2022-02-10T00:39:41+5:302022-02-10T00:40:01+5:30
उद्योजक व शिक्षणसंस्थाचालकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागून शिक्षणसंस्था नावावर करून देण्याची धमकी देतानाच जीवे मारण्याचा इशारा देणाऱ्या तीन संशयितांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी : उद्योजक व शिक्षणसंस्थाचालकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागून शिक्षणसंस्था नावावर करून देण्याची धमकी देतानाच जीवे मारण्याचा इशारा देणाऱ्या तीन संशयितांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीष लक्ष्मीचंद संघवी (७५) हे उद्योजक व शिक्षणसंस्थाचालक आहेत. रामेश्वरनगर, आनंदवल्ली, नाशिक येथे ते वास्तव्यास आहेत. दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे ते महावीर एज्युकेशन ट्रस्ट नावाची शैक्षणिक संस्था चालवितात. पूनमचंद पोपटलाल जैन (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) व त्यांचे सोबत दोन अनोळखी साथीदार अशा तिघांनी संगनमत करून फिर्यादी व साक्षीदार यांची गाडी अडवत त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली व मारहाण केली. तद्नंतर काही दिवसांनी पुन्हा हरीष संघवी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शिक्षणसंस्था नावावर करण्याबाबत सांगितले. संघवी यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली; परंतु तेथे त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.