४० टक्के गणेश मंडळांची महापालिकेकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:17 AM2019-08-24T01:17:10+5:302019-08-24T01:17:29+5:30
गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे.
नाशिक : गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा मंडप उभारणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा गमे यांनी शुक्रवारी (दि.२३) गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत दिला आहे.
शहरातील गणेश मंडळांची बैठक शुक्रवारी (दि.२३) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजीव गांधी भवनात पार पडली. गेल्यावर्षी शहरातील ६५० गणेश मंडळांनी मनपाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते, मात्र यंदा जेमतेम ३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जागेची तपासणी करून ७८ गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर २८८ परवानगी अर्जांवर पोलीस प्रशासनासमवेत पाहणी करून येत्या दोन दिवसांत परवानगीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, गणेशोत्सव तोंडावर असताना चाळीस टक्के मंडळांनी पालिकेकडे परवानगीसाठी अर्जच केले नाहीत, त्यामुळे ही मंडळे परवानगीसाठी अर्ज कधी करणार असा प्रश्न गमे यांनी उपस्थित केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनापरवाना मंडप उभारणी करणाऱ्यांवर करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सागंण्यात आले. गणेश मंडळांना महापालिकेने परवानगी दिली तरी जिल्हाधिकाºयांच्या पथकामार्फत तपासणी करावी लागते. गतवर्षी मनपाच्या कार्यवाहीत विसंगती आढळून आल्याने पालिकेच्या विभागीय अधिकाºयांवर कारवाई करावी लागली, असेही आयुक्त गमे यांनी सांगितले.