५५ किलो अफूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:23 AM2019-10-18T01:23:24+5:302019-10-18T01:23:50+5:30
नाशिक : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी ग्रामीण पोलीसदेखील सतर्क झाले असून, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सुमारे ...
नाशिक : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी ग्रामीण पोलीसदेखील सतर्क झाले असून, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सुमारे २७४ अवैध धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये सुमारे २४ लाख १३ हजार रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला, तसेच मालेगाव तालुक्यातील नाकाबंदीदरम्यान ५५ किलो ८५६ ग्रॅम अफूचा साठा एका वाहनातून जप्त केला आहे. तसेच संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध पोलिसांक डून प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे.
जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात ८ आंतरराज्य सीमावर्ती नाके कार्यान्वित असून, तेथे दिवस-रात्र स्थिर देखरेख पथकाकडून संशयास्पद वाहनांची झडती घेतली जात आहे. तसेच जिल्ह्याच्या अंतर्गत १२ ठिकाणी तपासणी नाके सुरू असून, प्रत्येक नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान, एका संशयास्पद वाहनाची तपासणी करत असताना सुमारे २ लाख ७९ हजार २८० रुपये किमतीचा ५५ किलो अफूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे.
तालुुकास्तरावरील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सिंह यांनी सर्वप्रथम विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापेमारी करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्णातील २७४ अवैध धंदे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या कारवाईमध्ये एकूण २४ लाख १३ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा व २५ लाख ५७ हजार रुपयांची वाहने व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
३५ शस्रे जमा; ३ तलवारी जप्त
आचारसंहिता काळात ग्रामीण पोलिसांनी परवानाधारक व्यक्तींकडून सुमारे ३५ शस्रे जमा केली आहेत. तसेच अवैधरीत्या शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांविरुद्ध कारवाई करत ३ तलवारी, दोन कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे ३९ संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच
१९ सराईत गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव चौकशीसाठी पाठविण्यात आले आहेत.