५ लाख नाशिककर झाले विमेकरी
By admin | Published: May 28, 2015 12:06 AM2015-05-28T00:06:21+5:302015-05-28T00:09:46+5:30
प्रधानमंत्री विमा योजना : कालावधी जून २०१५ ते मे २०१६
नाशिक : देशातील ८० टक्केनागरिक विमा क्षेत्राच्या बाहेर असल्याने कष्टकरी लोकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्राने सुरू केलेल्या विमा योजनांना नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ १७ दिवसांतच ही संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे.
अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या त्या तीन प्रकारच्या योजना आहेत. सुरक्षा विमा आणि जीवनज्योती या दोन्ही योजना अनुक्रमे १२ आणि ३३० रुपयांच्या असून, त्यांना चांगला प्रतिसाद आहे. केवळ १२ रुपयांत अपघात विमा आणि ३३० रुपयांत नैसर्गिक मृत्यू आल्यास २ लाख रुपयांचा परतावा त्यातून मिळणार आहे.
पेन्शन योजनेत सहभागी झाल्यानंतर आजचा युवक भविष्यात मुलांवर अवलंबून राहणार नाही. याशिवाय विमा योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या वारसांना या योजनेतून अपघातानंतर मदत दिली जाईल. ९ मे रोजी या योजनांचे उद्घाटन झाले तेव्हाच नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख ६५ हजार लोकांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर दररोज या योजनेला प्रतिसाद मिळत असून, सर्व बॅँकांचे मिळून सुमारे ५ लाख नागरिकांनी विम्याचे कवच विकत घेतले आहे.
हा विमा उतरवण्यासाठी खासगी बॅँकांनाही परवानगी देण्यात आल्याने बॅँकेने खातेधारकांना केवळ लघुसंदेशांच्या (एसएमएस) माध्यमातून ग्राहकांना आवाहन केले जात आहे. ज्या बॅँकेत खाते असेल त्याच बॅँकेत विमा उतरवण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास अनेक बॅँकांकडे विमा काढण्यासाठी खातेदारांनी धाव घेतली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र बॅँकेने ७० हजार विमे उतरवले आहेत.