बिबट्याच्या कातडी तस्करीसाठी नाशिकमध्ये पाच महिन्यांच्या बछड्याची पुन्हा शिकार 

By अझहर शेख | Published: September 15, 2022 08:25 PM2022-09-15T20:25:09+5:302022-09-15T20:27:34+5:30

११ लाखांत सौदा करताना दोघे तस्कर वनखात्याच्या जाळ्यात!

5 month old calf poached again in nashik for smuggling leopard skin | बिबट्याच्या कातडी तस्करीसाठी नाशिकमध्ये पाच महिन्यांच्या बछड्याची पुन्हा शिकार 

बिबट्याच्या कातडी तस्करीसाठी नाशिकमध्ये पाच महिन्यांच्या बछड्याची पुन्हा शिकार 

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये बिबट्याची छुपी शिकार राजरोसपणे केली जात असल्याच्या संशयाला बळ मिळाले आहे. नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने पेठ महामार्गावरील ननाशी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी (दि.१५) गोपनीय माहितीच्याअधारे सापळा रचून बिबट्याच्या कातडीचा ‘सौदा’ करण्यास आलेल्या दोघा तस्करांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या दोघांचा म्होरक्या मात्र अद्यापही फरार असून वनपथके त्याच्या मागावर आहे. बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा  आठवडाभरात हा दुसरा डाव वनपथकाने शिताफीने उधळला. 

त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील आंबोलीफाटा येथे गेल्या सोमवारी (दि.५) इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या पथकाने शिताफीने मोखाडा तालुक्यातील चौघा तस्करांना कातडीची विक्री करताना रंगेहाथ पकडले होते. या चौघांना वनकोठडीनंतर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. यानंतर दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीशीर बातमी बिरारी यांना मिळाली. त्यांनी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांना याबबत कळविले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून बिरारीस यांनी इगतपुरी, नाशिक, ननाशी, पेठ अशा चारही वनपरिक्षेत्रांमधील वनपाल, वनरक्षकांचे चार पथके तयार केली. गुरुवारी सकाळी या पथकांना विविधप्रकारे सुचना देत नियोजनबद्ध पद्धतीने पेठ महामार्गावर चाचडगाव टोल नाका ते ननाशी दरम्यान सापळा रचण्यात आला. संशयितांसोबत वनपथकातील कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक म्हणून संवाद साधत व्यवहार ११ लाखांत ‘फिक्स’ केला. 

दोघे संशयित आंबेगण फाट्यावर एका शालीमध्ये गुंडाळून बिबट्याची कातडी घेऊन दुपारी चार वाजेच्या सुमारास आले असता पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. संशयित मोतीराम महादू खोसकर (३६, रा.आडगाव देवळा, ता.त्र्यंबकेश्वर), सुभाष रामदास गुंबाडे (३५,रा.पाटे, पेठ) या दोघांना वनपथकाने वन्यजीवांची शिकार करून कातडीच्या तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र आधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ आधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, रुपेश दुसाने, वनरक्षक विठ्ठल गावंडे, गौरव गांगुर्डे, फैज अली सैय्यद, मझहर शेख, गोरख बागुल, कैलास पोटींदे, चिंतामण गाडर, शरद थोरात, राहुल घाटेसाव, उत्तम पाटील, विजय पाटील, प्रकाश साळुंखे  वाहनचालक नाना जगताप, मुज्जू शेख, सुनील खानझोडे  आदींनी सहभाग घेतला. संशयितांकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली आहे. 

या वन गुन्ह्याचा पुढील तपास हा ननाशी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील या करीत आहेत. दोघा संशयितांविरुद्ध रात्री उशीरापर्यंत नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: 5 month old calf poached again in nashik for smuggling leopard skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.