५० कोटींची कामे क्षणार्धात मंजुरीने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:51 AM2019-06-21T01:51:34+5:302019-06-21T01:53:02+5:30
महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनिटात मंजूर केल्याचे सांगितल्याने विरोधकच हबकले.
नाशिक : महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनिटात मंजूर केल्याचे सांगितल्याने विरोधकच हबकले. त्यांनी विरोध करण्याच्या आतच महासभेचे कामकाज संपुष्टात आणल्याने विरोधकांनी महापौरांचा निषेध असो अशा घोषणा गुरुवारी (दि.२०) महासभेत दिल्या.
या प्रकारामुळे महापालिकेतील अर्थकारणाचा वाद पेटला असून, महासभेच्या दरम्यान साध्या विषय पत्रिकांमध्येही स्थायी समितीच्या प्रस्तावांची यादी नाही की प्रस्तावही नाही. या प्रकारामुळे भाजपा आणि सेनेचे नगरसेवक बुचकळ्यात पडले, तर दुसरीकडे कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसे आणि अपक्षांनी महासभेला अंधारात ठेवून घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र देण्यात आले असून, या बेकायदेशीर कामकाजाला विरोधक जबाबदार तर राहणार नाहीच शिवाय आयुक्तांनीदेखील महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी केली आहे.
महापालिकेची मासिक महासभा गुरुवारी (दि.२०) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक दहामधील पोटनिवडणूक बिनविरोध निवड झाली असली तरी त्याची अधिकृत घोषणा २४ जून रोजी होणार आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता या प्रभागापुरती असल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे प्रशासनाने अगोदरच सुचित केले होते. महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सध्या प्रभाग दहासाठी निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र सभा घेण्यात येईल. मात्र विषय पत्रिकेवरील विकासकामांचे सर्व विषय मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अखत्यारीत असलेले विकासकामांचे सर्व विषय हे महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३५ नुसार मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावेळी राष्टÑवादीचे गजानन शेलार, शाहू खैरे, गुरुमित बग्गा यांनी हात उंचावून त्यास विरोध केला.
महापौर म्हणतात,
नगरसेवकांची कामे झाली पाहिजे
महापौर रंजना भानसी यांनी सांगितले की, मला इतर काही माहिती नाही, मात्र नगरसेवकांची कामे झालीच पाहिजे यासाठी सर्व विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. आचारसंहिता आणि अन्य कारणाने सर्व कामे प्रलंबित आहेत. नगरसेवकांची कामे होत नसल्याची ओरड होत आहे त्यामुळे विषय मंजूर केल्याचे सांगतानाच अन्य धोरणात्मक विषयांसाठी २५ जून रोजी सभा घेण्यात येईल. त्यात बेकायदा धार्मिक स्थळे, सेंट्रल किचन, मनपाच्या मिळकती हे विषय हाताळण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भाजपा-सेनेतही खदखद
महापालिकेचा कारभार मोजकेच चार ते पाच पदाधिकारी हाकत असून, त्यामुळे महासभापूर्व बैठकीत बुधवारी (दि.१९) भाजपाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारी महासभा घेत असताना ज्यादा विषयांची यादी किंवा स्थायी समितीतील प्रलंबित कामांचे प्रस्ताव या महासभेत घेतल्यानंतर त्याची यादीदेखील नगरसेवकांना देण्यात आली नसल्याने भाजपाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासगीत नाराजी व्यक्त करताना महापौरांना असेच कामकाज करायचे होते तर त्यांनी घरीच सभा घ्यायला हवी होती, आम्हाला सभागृहात कशाला बोलवले, असा संताप व्यक्त केला.