नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी
By admin | Published: February 4, 2015 02:03 AM2015-02-04T02:03:19+5:302015-02-04T02:05:42+5:30
नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी
नाशिक : महापालिका आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहे. ठेकेदारांची सुमारे ८५ कोटी रुपयांची देयके थकलेली आहेत. तरीही महासभेत ठरल्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, सदस्यांनी सबुरीने घेत अत्यावश्यक कामांवर भर द्यावा, असा सल्ला महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
नगरसेवक निधीवरून तापलेले राजकारण आणि सत्ताधारी मनसेतच वाढलेली धुसफुस या पार्श्वभूमीवर महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, प्रशासनाकडून ३० लाखांपर्यंतच्याच कामांना प्राधान्य देण्याचा आग्रह होता; परंतु महासभेने प्रशासनाला ५० लाखांची मर्यादा घालून दिली आहे. महापालिका कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. उत्पन्न असेल तर विकासकामांसाठी खर्च करण्याकरिता निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचे आणि घरपट्टी, पाणीपट्टीतील गळती शोधण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न आणि मिळकतींची एकूण संख्या पाहता त्यात मेळ बसत नाही. त्यासाठीच एका एजन्सीमार्फत शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याबाबत आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. आयुक्तांनीही ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. सदस्यांनीही अत्यावश्यक कामांवरच भर दिला पाहिजे. सध्या स्थायी समितीवर मंजूर झालेली विकासकामे करण्यावर भर राहणार असून, नगरसेवकांना ५० लाखांत नव्यानेही कामे सुचविता येणार आहेत. दरम्यान, मनसेत नगरसेवक निधीबाबत कोणतीही धुसफुस नसून कुणाच्या राजीनाम्याने महापालिकेला काही फरक पडणार आहे काय, असा टोलाही महापौरांनी गटनेत्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे लगावला.