सीएसआर निधीतून ५० लाखांची यंत्रसामग्री : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 07:37 PM2017-09-18T19:37:59+5:302017-09-18T19:38:05+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील अर्भक मृत्यूमुळे समोर आलेल्या उपकरणांच्या कमतरतेचा प्रश्न कंपन्यांच्या सीएसआर (कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व) निधीतून मार्गी लावण्यात आला असून, येत्या पंधरा दिवसांत सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचे साहित्य जिल्हा रुग्णालयात फिट करण्यात येणार असल्याचे असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि़१८) पत्रकार परिषदेत सांगितले़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़
पालकमंत्री महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासह अधिकाºयांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन एसएनसीयू (स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) भेट देऊन पाहणी केली़ यानंतर जिल्हा रुग्णालयात २१ कोटी रुपये मंजूर असलेल्या अद्ययावत माता-बालक संगोपन इमारतीची जागा, अतिदक्षता विभाग या ठिकाणांची पाहणी करून कमतरता असलेल्या उपकरणांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली़
महाजन यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी कमतरता असलेल्या उपकरणांबाबत फिनोलेक्स कंपनीचे प्रकाश छाब्रिया यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, त्यांनी आपल्या ट्रस्टच्या सीएसआर निधीतून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांची यंत्रसामग्री देण्यास मंजुरी दिली आहे़ या निधीतून एसएनसीयू विभागासाठी १६ बेबी वॉर्मर, १० फोटोथेरेपी, १५ पल्स आॅक्सीमीटर, २० सिरिंज पंप, एक बिलीरुबीनो मीटर, एक मोबाइल एक्स रे युनिट येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत रुग्णालयास मिळणार आहे़ याबरोबरच अतिदक्षता विभागात आणखी पाच व्हेंटिलेटर्स मिळणार आहेत़
फिनोलेक्स कंपनीबरोबरच आणखी एका कंपनीसोबत सीएसआर निधीबाबत चर्चा होऊन सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे़ या निधीतून जिल्हा रुग्णालयातील उपकरणांचा प्रश्न मार्गी लावला जाणार असून, याखेरीज शासन स्तरावरूनही निधी उपलब्ध केला जाईल, मात्र त्याच्या प्रक्रियेसाठी कालावधी लागणार असल्याने सीएसआर निधीचा पर्याय शोधल्याचे महाजन यांनी सांगितले़