नाशिक उपकेंद्रासाठी ५० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:54 AM2019-04-22T00:54:30+5:302019-04-22T00:54:49+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या कामकाजासाठी सुरुवातीला दहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्याचा तसेच, स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोजगारनिर्मितीसाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या कामकाजासाठी सुरुवातीला दहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्याचा तसेच, स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोजगारनिर्मितीसाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) नाशिक उपकेंद्राच्या उभारणीसाठी ५० लाख आणि प्रशासकीय कामकाजासाठी ७० लाख अशा एकूण एक कोटी २० लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे.
अधिसभा सभेला व्यवस्थापन परिषदेचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, विजय सोनवणे, प्रा. डॉ. नंदू पवार, मोतीराम देशमुख, कल्पना आहेर, तानाजी वाघ, दिनेश नाईक, अमित पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाशी निगडित विविध बाबींवर चर्चा झाली. त्यापैकी नाशिकच्या उपकेंद्राच्या उभारणी कार्यासाठी ५० लाख, तर प्रशासकीय बाबींसाठी ७० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी विद्यापीठातर्फे नियुक्त केलेल्या उपकेंद्र उभारणीसंदर्भात समितीने सादर केलेल्या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता देऊन हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर पुढील प्रक्रियेला गती मिळणार असून, नाशिकच्या उपकेंद्रासाठी सरकारकडून मिळालेल्या दिंडोरी तालुक्यातील सोनई येथील जागेवर कामकाजासाठी सुरुवातीला १०,००० चौरस फूट बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी (दि. २०) मंजूर केलेला ५० लाखांचा निधी आर्किटेक्ट निवड, प्रोजेक्ट मॅरेजर नियुक्तीसह अन्य विविध बाबींकरिता उपयोगात आणला जाणार असल्याने आगामी काही काळात उपकेंद्र उभारणीला चालना मिळण्याचे संकेत आहेत.