पाणीयोजनेत ५० टक्के कपात
By admin | Published: June 4, 2016 09:58 PM2016-06-04T21:58:54+5:302016-06-05T00:06:43+5:30
जलसंकट : चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा होणार आठवड्यानंतर
सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच जलसंकट ओढावले आहे. योजनेच्या तळ्यात पाणीसाठा कमी राहिल्याने व आवर्तन सुटण्यास उशीर असल्याने ५० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा वावीचे उपसरपंच विजय काटे यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वावीसह अकरा गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीयोजना राबविण्यात आली आहे. या पाणीयोजनेमुळे वावी व परिसरातील दहा गावांना गेल्या चार वर्षांत अजिबात पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र यावर्षी या योजनेवर पाणीकपातीची वेळ आली आहे.
वावी, कहांडळवाडी, मिठसागरे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मिरगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी व शहा या ११ गावांचा समावेश या पाणीयोजनेत करण्यात आला आहे. गोदावरी उजव्या कालव्याजवळ कोळगावमाळ शिवारात मोठा तलाव करून त्यात पाणी साठविण्यात आले आहे. या तलावाशेजारीच जलशुद्धीकरण केंद्र असून त्याद्वारे योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शिर्डी व राहाता पाणीयोजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्याला दर दोन महिन्यांतर आवर्तन सुटते. त्यावेळी या योजनेचे तळे भरले जाते. मात्र सध्या आवर्तन सुटण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे तळ्यातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या तळ्यात केवळ १ ते सव्वा मीटर पाणी शिल्लक आहे. पाऊस झाल्यानंतर गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सुटू शकते. त्यामुळे तळ्यातील पाणी आवर्तन सुटेपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पाणीयोजनेत समाविष्ट असणाऱ्या अकरा गावांचा पाणीपुरवठा ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या गावांना चारऐवजी आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळणार आहे. गोदावरी कालव्याला पाणी सुटल्यानंतर या योजनेवरील जलसंकट दूर होईल. गेल्या चार वर्षांत
वावीसह अकरा गावांना वरदान ठरणारी पाणीयोजना यावर्षीच्या दुष्काळामुळे संकटात सापडली आहे. (वार्ताहर)