धक्कादायक! राज्यात रस्ते अपघातात 4 महिन्यांत 5 हजार नागरिकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:43 PM2022-06-15T12:43:43+5:302022-06-15T12:44:40+5:30

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली ...

5,000 killed in 4 months in road accidents in the state | धक्कादायक! राज्यात रस्ते अपघातात 4 महिन्यांत 5 हजार नागरिकांचा बळी

धक्कादायक! राज्यात रस्ते अपघातात 4 महिन्यांत 5 हजार नागरिकांचा बळी

Next

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली तयार केली असली, तरी अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याने अपघात घडतात. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृतीवर भर दिला जातो. मात्र, असे असतानाही राज्यात चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात १९ हजार ३८३ अपघात घडले आहेत. या अपघातात नऊ हजार १२० नागरिक जखमी झाले, तर ५ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात झालेल्या अपघातात एकूण अपघाताचे सर्वाधिक प्रमाण मुंबई शहरात असल्याचे स्पष्ट झाले. तर अपघातात बळी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असून ५२ अपघातांत १७ नागरिकांनी जीव गमावला आहे. जानेवारी ते एप्रिल चार महिन्यांच्या कालावधीत एकट्या मुंबई शहरात तब्बल ८७६८ अपघात झाले. या अपघातात ५९७ नागरिक जखमी झाले असून १२९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी ८२८ अपघातांत सुमारे ६४७ नागरिक जखमी होऊन १६४ नागरिकांचा जीव गेला होता. गतवर्षी २०२१ मध्ये सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले होते.

२०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यात झालेल्या एकूण अपघातांत मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. अपघातात नाशिक ग्रामीण चौथ्या क्रमांकावर असून जीव गेलेल्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. चार महिन्यांत बळी जाणाऱ्यांची संख्या ४०७ असून अपघातात नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३४२ आणि नाशिक शहरात ६५ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक असून त्याखालोखाल नागपूरचा क्रमांक लागतो. नाशिकचा तिसरा क्रमांक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत झालेल्या अपघातांत बळी जाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्याची आहे. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो.

नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

वाहन चालविताना वाहन चालक अति वेगाने धोकादायक पद्धतीने वाहने चालवितात. त्यावेळी स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात आणि त्यातून अपघात घडतात. वाहन चालकांनी हेल्मेट तसेच सीटबेल्टचा वापर करणे, वाहन वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविले, तर अपघातावर नियंत्रण बसेल.

-प्रदीप शिंदे, (प्रभारी) प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

Web Title: 5,000 killed in 4 months in road accidents in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.