नाशिक जिल्ह्यातून ३६१ उमेदवारांचे ५०६ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 10:13 AM2024-10-30T10:13:19+5:302024-10-30T10:13:55+5:30
इगतपुरी आणि मालेगाव बाह्य मतदार संघातून सर्वाधिक ४३ अर्ज दाखल झाले असून सर्वात कमी २२ अर्ज कळवण मधून दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकांसाठी नाशिक मधील १५ मतदारसंघांमधून उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत जिल्ह्यातील ३६१ उमेदवारांनी ५०६ अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये इगतपुरी आणि मालेगाव बाह्य मतदार संघातून सर्वाधिक ४३ अर्ज दाखल झाले असून सर्वात कमी २२ अर्ज कळवण मधून दाखल झाले आहेत.
यामध्ये एकाच उमेदवाराने दोन-तीन अर्ज दाखल केल्याने अर्जाची संख्या वाढल्याचे दिसून येत असले तरी छाननीनंतर अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांनी २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्पामृत योगाच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले होते. मात्र काहींना बुधवारी उमेदवारी जाहीर झाल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ गेला. त्यामुळे वसुबारसच्या मुहूर्तावर सोमवारी बहुतांश उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी त्याला पूरक कागदपत्रे जोडलेली नव्हती.
मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यावेळात धावपळ करत अनेकांनी एबी फॉर्म तसेच मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र आणि अन्य विवरण सादर केले. नाशिक शहरात ऐनवेळी उद्धवसेनेचे मुशीर सय्यद यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.