सनातन धर्माच्या प्रसारासाठी नाशिकसह स्थापणार ५१ मठ
By Admin | Published: September 10, 2015 12:13 AM2015-09-10T00:13:31+5:302015-09-10T00:13:59+5:30
संतसंमेलन : शंकराचार्य अधोक्षजानंद यांची घोषणा
पंचवटी : अध्यात्मिक संपदा कोणाला कमजोर करण्यासाठी, तसेच छळण्यासाठी नव्हे तर सर्वांना शक्तिशाली बनविण्यासाठी आहे. भारतीय संस्कृती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, सनातन धर्माच्या प्रचारासाठी नाशिकसह ५१ शंकराचार्य मठ स्थापन करणार आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू शंकराचार्य अधोक्षजानंद महाराज यांनी केले.
शंकराचार्य मठात धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संतसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग, झेंडाबाबा, भागवताचार्य अनुरागकृष्णशास्त्री आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी पुढे असे सांगितले की, देशात अराजकता व भयावह परिस्थिती उदभवू नये यासाठी नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. सनातन धर्माचा प्रचार केल्यास भारतीय संस्कृती टिकून राहील आणि यासाठीच नाशिकमध्ये १ तर आसाम, अरुणाचल, मेघालय, मिझोराम या राज्यांच्या सीमारेषेवर १५, जम्मू-काश्मीरमध्ये १0 आणि उर्वरित पंजाब, गुजरात, राजस्थान व पाकिस्तानच्या सीमारेषेवर १६ व अन्य राज्य मिळून जवळपास ५१ शंकराचार्य मठाच्या शाखा स्थापन करून संस्कार निर्मितीसाठी शिक्षण, अध्यात्माच्या माध्यमातून नवीन पिढी घडविणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
या संतसंमेलनाला बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिलकुमार शर्मा, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, सरदारसिंग गुरुजी आदिंसह साधू-महंत व भाविक उपस्थित होते. (वार्ताहर)