गंगापूर धरणात ५१ टक्के पाणीसाठा
By admin | Published: March 20, 2017 09:21 PM2017-03-20T21:21:03+5:302017-03-20T21:21:03+5:30
अपव्यय करणाऱ्यांवर होणार कारवाई.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २० मार्चअखेर ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २० मार्चअखेर ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पाणीसाठा पुरेसा असला तरी उन्हाळ्यात पाणीबचतीचे आवाहन महापालिकेने केले आहे. याशिवाय, पाण्याचा गैरवापर व अपव्यय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक महापालिकेला दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूर धरणात ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू याप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत गंगापूर धरणातील सुमारे १५५० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सदर पाणीसाठा महापालिकेला ३१ जुलैपर्यंत पुरवायचा आहे. २० मार्चअखेर गंगापूर धरणात २८६३ दलघफू म्हणजे ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर धरण समूहातील काश्यपी धरणात १७७७ दलघफू म्हणजे ९६ टक्के, गौतमी गोदावरीत २९७ दलघफू म्हणजे १६ टक्के तर आळंदीत ४६४ दलघफू म्हणजे ४८ टक्के पाणीसाठा आहे. एकूण गंगापूर धरणसमूहात ५४०१ म्हणजे ५२ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी २० मार्चअखेर गंगापूर धरणात १७३९ दलघफू म्हणजे अवघा ३१ टक्के पाणीसाठा होता, तर धरणसमूहात अवघा २६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गंगापूर धरणात जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे जिल्हा प्रशासन व महापालिकेमार्फत सांगितले जात असले तरी दुसरीकडे पाणीबचतीचेही आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गंगापूर धरणातून रोज सुमारे ४१५ ते ४२० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. याशिवाय, कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचाही वेग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.