५१३ रिक्त जागांवर उमेदवारांची निवड रोजगार मेळावा : ८५२ जागांसाठी २,३३२ उमेदवारांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:10 AM2018-02-07T01:10:05+5:302018-02-07T01:10:35+5:30
नाशिक :महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने बेरोजगारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : नाशिक महानगरपालिका, नाशिक व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय उपजीविका अभियान यांचे संयुक्त विद्यमाने बेरोजगारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात २,३३२ उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती होऊन ५१३ रिक्त जागांसाठी उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महापौर रंंजना भानसी आणि आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या हस्ते झाले. एकूण ८५२ रिक्त जागांसाठी झालेल्या या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात विविध २६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, विधी समिती सभापती शीतल माळोदे, पूर्व विभाग सभापती शाहीन मिर्झा, नगरसेवक जगदीश पाटील, मुकेश शहाणे, रु ची कुंभारकर, नगरसेवक स्वाती भामरे, हिमगौरी आडके, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर, आर. आर. गोसावी, सुनील सैंदाने, उपसंचालक संपत चाटे आदी उपस्थित होते.
२६ कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित
मेळाव्यात मुलाखतीसाठी विविध २६ कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित होते. यावेळी २,३३२ उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या ५१३ रिक्त जागांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली. याचवेळी स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.