शिक्षक मतदारसंघासाठी ५२ हजार मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:21 AM2018-05-14T00:21:33+5:302018-05-14T00:21:33+5:30
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत ५२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकरोड : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत ५२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक मतदार संघासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, भाजपासह कॉँग्रेस संलग्न शिक्षक संघटनांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तर काहींनी यापूर्वीच उमेदवारी घोषित केली आहे. निवडणुकीत पुरुष मतदार ३९ हजार ६२४, स्त्री मतदार १२ हजार ५७७ असून, एकूण ५२ हजार २०१ मतदार आहेत. पाचही जिल्ह्याच्या तहसीलदारांना मतदार केंद्र प्रस्तावित करण्यात आले असून, ९४ मतदार केंद्रांवर मतदार प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच जम्बो मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली असून, मतदानासाठी मतपत्रिका राहणार आहेत. मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करणे आवश्यक असल्याची माहिती विभागीय आयुक्त माने यांनी दिली.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीच्या निमित्ताने पाचही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक अधिसूचना १५ मे रोजी जारी करण्यात येणार आहे. २२ मे पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत असून, २३ मे रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येणार आहे. २५ मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून, ८ जूनला सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत मतदानाची मुदत आहे.