जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू
By Sandeep.bhalerao | Published: August 30, 2023 05:27 PM2023-08-30T17:27:00+5:302023-08-30T17:27:50+5:30
आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा झाल्याने सुमारे ५२६ जनावरे बाधित झाली आहेत. या जनावरांचे विलगीकरण आणि गोठे निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे.
लम्पीचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्ह्यात चार ठिकाणी भरणारे जनावरांचे बाजारदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ लागला असून, ५०० पेक्षा अधिक जनावरांना लागण झाली आहे. मात्र, जनावरांचे जवळपास शंभर टक्के लसीकरण झाल्याने लागण झालेल्या जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे सौम्य असल्याचेही सांगण्यात आले. सौम्य, मध्यम तीव्र आणि अतितीव्र असे लम्पी जनावरांचे वर्गीकरण करण्यात येत असून, त्यानुसार उपचार केले जात आहेत. शेतकरी, गोठेधारकांचे लम्पी आजाराबाबत प्रबोधन करण्याची मोहीम सुरू असल्याचेदेखील पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
मागील वर्षी लम्पी आजाराची लागण झाल्याने ११५ जनावरांचा मृत्यू झाला होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये पशुधनाचा अशाप्रकारचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. यंदा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे पशुधनाचे नुकसान फारसे झाले नसल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला.