डिसेंबरमध्ये आढळले ५४ डेंग्यू रुग्ण
By admin | Published: December 29, 2015 11:17 PM2015-12-29T23:17:45+5:302015-12-29T23:21:07+5:30
कहर सुरूच : वर्षभरात ४०४ जणांवर उपचार
नाशिक : चालू वर्षी शहरात डेंग्यूच्या लागणची संख्या सुमारे एक हजाराच्या घरात गेली. अर्थात, शासकीय प्रयोगशाळेतील तपासणीअंती ४०४ रुग्णांनाच डेंग्यू झाल्याचे आढळले. मात्र, डेंग्यूच्या लागणची ही समस्या अद्याप सुटलेली नाही. चालू महिन्यात ५४ जणांवर उपचार करावे लागले आहेत. साहजिकच स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील मूलभूत आरोग्य सुविधांची असलेली दशा यानिमित्ताने समोर आली आहे.
पावसाळ्यापाठोपाठ आजारही येतात त्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यांचे प्रमाण वाढते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर साचलेल्या पाण्यात डेंग्यू पसरविणाऱ्या डासांची निर्मिती होत असल्याचे सांगितले जात असले तरी यंदाच्या वर्षी मात्र डेंग्यूचा मुक्काम वर्षभर असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात १२, फेब्रुवारीत पाच, मार्च महिन्यात एक, एप्रिलमध्ये तीन, मे महिन्यात एक, जून महिन्यात सहा, जुलै महिन्यात २९, आॅगस्ट महिन्यात २४, सप्टेंबर महिन्यात ६७, आॅक्टोबर महिन्यात उच्चांकी १०४ तर नोव्हेंबर महिन्यात ९५ आणि चालू महिन्यात आत्तापर्यंत ५४ रुग्ण आढळून आले.
वर्षभराचा विचार केला तर ९१४ संशयित डेंग्यू रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४०४ पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर ४८२ निगेटिव्ह आढळले आहेत. २८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. ज्या ४०४ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले, त्यातील ३२० रुग्णच महापालिका हद्दीतील असून उर्वरित रुग्ण हे पालिका हद्दीशी संबंधित नसल्याचे पालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ते मान्य केले तरी ३२० रुग्ण वर्षभरात आढळले ही संख्या छोटी नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य प्रतिबंधक योजना थिट्या पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा तर वर्षभर पेस्ट कंट्रोलचा ठेका वादात होता. ठेका वादात आणि ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांचा ठेकेदार आणि महापालिकेशी वाद अशी स्थिती होती. त्यामुळे साहजिकच या वादात मात्र नागरिकांचे हाल झाले. अजूनही डेंग्यू पसरत असताना शहरात डास निर्मूलन मोहिमेची ऐशी तैशी झाली होती. त्याचा परिणाम दिसून आला आहे. (प्रतिनिधी)