महिन्याला ५५ हजारांवर सीटी स्कॅन, शासकीय दर नावालाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:08+5:302021-04-11T04:14:08+5:30
नाशिक : एखाद्याला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी त्याची टेस्ट करून ती लॅबला पाठविली जाते. ...
नाशिक : एखाद्याला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी त्याची टेस्ट करून ती लॅबला पाठविली जाते. ती व्यक्ती बाधित असली तरी सीटी स्कॅनच्या तपासणी अहवालातून कोरोना लागणचे प्रमाण समजून घेण्यासाठी एचआरसीटी केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात महिन्याला ५५ हजारांहून अधिक सीटी स्कॅन होत असून कुठे ५ हजार तर कुठे ८ हजारांहून अधिक रक्कम नागरिकांकडून घेतली जात आहे. स्कॅनसाठी निर्धारित केलेल्या दरांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट रक्कम घेतली जात असून शासकीय दर केवळ नावालाच उरले आहेत.
काही संशयित कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना निदान करणारी महत्त्वपूर्ण चाचणी आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन करण्यापेक्षा थेट एचआरसीटी-चेस्ट करून डॉक्टरांना पाठवित असल्याचे चित्र काही प्रमाणात तरी आहेे. काही नागरिक आरटीपीसीआरनंतर लागणचे प्रमाण नक्की किती आहे, घरी उपचार घ्यावेत की रुग्णालयातच ॲडमिट व्हावे यासाठीचा निर्णय घेण्यासाठीदेखील एचआरसीटी अर्थात हाय रिझोल्यूशन सीटी स्कॅनचा उपयोग होत असला तरी त्यासाठी नागरिकांना निर्धारित रकमेपेक्षा दुप्पट, तिप्पट जादा रक्कम मोजावी लागत आहे.
इन्फो
फुप्फुसावर केंद्रीत उपचार
बहुतांश नागरिकांना आपले फुफ्फुस सुरक्षित असेल तर फार घाबरायची गरज नाही, हे लक्षात आले आहे. त्यामुळे एचआरसीटी करून किती प्रमाणात लागण झाली, ते एकदा कळले की निर्णय घेणे सोपे होते. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली तरी प्रमाण म्हणजेच एचआरसीटीचा स्कोअर कमी असेल तर घरीच गोळ्या खाऊ, असा विचार त्यामागे नागरिकांचा असतो. प्रमाण जास्त असेल तर मात्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे अशीच नागरिकांची धारणा आहे. त्यासाठीच एचआरसीटीचा आधार घेऊन फुप्फुस केंद्रीत चाचण्या आणि उपचार केले जातात.
इन्फो
५ ते ८ हजार रुपये दराची आकारणी
सध्याच्या काळात सिटी स्कॅन करून घेणाऱ्याची संख्या वाढली आहे. गंभीर सिटी स्कॅनची चाचणी सर्वांना परवडावी म्हणून शासनाने राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले असून १६ स्लाईसच्या चाचणीसाठी २ हजार, १६ ते ६४ स्लाईसच्या चाचणीसाठी २५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या चाचणीसाठी ३ हजार रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र, रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा नाईलाज असल्याने खासगी लॅबमधून त्यांना ५ हजार ते ८ हजार रुपये अशा दराने एचआरसीटी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
इन्फो
फुप्फुसाच्या इजांचे गुणांकन
कोरोनाच्या या आजारात फुफ्फुसाचे आरोग्य पाहण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी विशेष अशी गुणांकन पद्धती निश्चित केली आहे. ही गुणांकन पद्धती फुफ्फुसाच्या पाच भागात विभागण्यात आली आहे. फुफ्फुसाचा उजवा भाग म्हणजे वरचा कप्पा, मधला कप्पा आणि खालचा कप्पा तर डावा भाग म्हणजे वरचा कप्पा आणि खालचा कप्पा. प्रत्येक कप्प्याला १ ते ५ गुण ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार त्या कप्प्यांना किती इजा झाली आहे, ते स्कॅनच्या चाचणीत डॉक्टरांना कळते. त्यानुसार गुण देऊन त्याचे एकूण गुणांकन केले जाते. त्यांच्यानुसार डॉक्टर त्याच्या फुफ्फुसाच्या इजांबाबत आपले मत व्यक्त करून उपचाराची दिशा निश्चित करतात.