बागलाणमध्ये चार दिवसात ५५२ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:08+5:302021-04-14T04:14:08+5:30
बागलाण तालुक्यात आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याने ७५ टक्के गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे भयावह चित्र ...
बागलाण तालुक्यात आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याने ७५ टक्के गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे भयावह चित्र बघायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात कोरोना बधितांचा आकडा पंधराशे पार झाला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन दररोज सरासरी ११० रुग्ण आढळून येत आहेत. दि. ८ एप्रिलला १३७ बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण सटाणा शहरातील नामपूर रस्त्यावरील नववसाहती, मालेगाव रोड, चौगाव रोड येथील नववसाहती तसेच जुन्या गावातील बाजारपेठेतील होते. त्यापाठोपाठ नामपूर, ताहाराबाद, लखमापूर, ब्राह्मणगाव, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, काकडगाव, आराई, ठेंगोडा, मुंजवाड, वीरगाव, अंतापूर, मुल्हेर ही गावे कोरोनाचे मुख्य केंद्र ठरली आहेत. त्यानंतर दि. ९ एप्रिलला तब्बल २३१ रुग्ण आढळून आले. दि. ११ एप्रिलला २४, तर १२ एप्रिलला १६० बाधित रुग्ण आढळून आले. गेल्या पाच दिवसात बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
पश्चिम पट्ट्याला विळखा
बागलाणमधील देशी भागाला कोरोनाने घट्ट विळखा घातल्याचे चित्र बघायला मिळत असताना जो परिसर सेफ झोन म्हणून ओळखला जात होता, तो पश्चिम आदिवासी पट्टा आता क्रिटीकल झोन झाला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुल्हेर, पायरपाडा, केळ्झर, वाठोडा, वाघांबे, बाभुळणे, अलियाबाद या परिसरात शिरकाव झाला आहे.
तिशीच्या आतील रुग्ण १८३
गेल्या चार दिवसात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये ३० वर्षांच्या आतील रुग्ण संख्या जास्त असल्याने घबराट निर्माण झाली आहे. पाच दिवसात २१ ते ३० वयोगटातील तब्बल ११३ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये २१ ते २५ वयोगटातील संख्या ४५ टक्के आहे. १ ते २० वयोगटातील रुग्ण संख्या ७० इतकी आहे. तसेच १५ ते २० वयोगटातील संख्या ४० टक्के, १० ते १५ वयोगटातील संख्या ४४ टक्के इतकी असून, उर्वरित रुग्ण संख्या १ ते ९ वयोगटातील आहे.