नांदगावी गटासाठी ५७ अर्ज
By admin | Published: February 6, 2017 12:00 AM2017-02-06T00:00:58+5:302017-02-06T00:01:20+5:30
मोठ्या प्रमाणात अनामत रक्कम जमा
नांदगाव : तालुक्यात रविवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्हा परिषद निवडणूक गटासाठी एकूण दहा तर गणासाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर आॅनलाइन प्रक्रि येत जिल्हा परिषदेच्या चार गटासाठी एकूण ५७ अर्ज तर तालुका पंचायत समितीच्या आठ गणासाठी ९४ अर्ज दाखल झालेत आजही मोठ्या प्रमाणात अनामत रकमा जमा झाल्या.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षीत असताना अनेक उमेदवारांच्या पातळीवर राजकीय निर्णय होत नसल्याने मोजक्या संख्येने अर्ज दाखल झालेत. सोमवारी अंतिम दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी उसळेल असा कयास आहे. दरम्यान, रविवारी साकोरा गटातून शिवसेनेच्या वतीने सुभाष कुटे यांनी गट व गणात आपले अर्ज दाखल करताना खबरदारीचा उपाय म्हणून अपक्ष म्हणून देखील अर्ज भरला तर साकोरा गटातच राष्ट्रवादीच्या नम्रता पगार यांनीही गटगणात पक्षासोबत अपक्ष अर्ज दाखल केला या गटात दिलीप पगार व मल्हारवाडीचे सुखदेव खैरनार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला न्यायडोंगरी गटात आश्विनी आहेर यांनी काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल केला. भालुर गटातून मंदाताई सोनवणे व प्रतिभा लिहरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.जातेगाव गटासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. पंचायत समितीच्या वेहेळगाव गणासाठी रमेश पगार, सुभाष कुटे, रत्नाबाई मोरे, भानुदास पाटील यांनी तर साकोरा गणासाठी विमल खैरनार,सुरेखा पैठणकर ,सावरगाव गणासाठी भाग्यश्री मोरे, न्यायडोंगरी गणासाठी शंकुतला मोरे, पानेवाडी गणासाठी संजय शेरमाळे यांनी अर्ज दाखल केले. भालूर, मांडवड व जातेगाव गणासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. (वार्ताहर)