पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा
By अझहर शेख | Published: August 8, 2023 01:40 PM2023-08-08T13:40:52+5:302023-08-08T13:41:39+5:30
नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
नाशिक : पुणे-नाशिकरेल्वेसाठी जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत सिन्नर तालुक्यातील १७ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया राबवत ४५ हेक्टर इतके क्षेत्र थेट खरेदी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये ४४५ गटांचा समावेश असून १२५ खरेदी खत नोंदविण्यात आले आहेत. नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे भूसंपादनासह पुढील सर्वच काम मागील काही महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकला झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना या प्रकल्पाला गती देणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी मंगळवारी (दि.८) जिल्हा प्रशासनासोबत ऑनलाइन आढावा बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत विविध सूचना याबाबत दिल्या जाण्याची शक्यता आहे. हा रेल्वेमार्ग एकूण २३२ किमीचा आहे. या द्रुतगती रेल्वे मार्गासाठी काही गावांत जमिनींचे संपादनही सुरू झाले. जिरायत, हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमिनीसाठी प्रतिहेक्टरी दर प्रशासनाने जाहीर केले. राज्यात झालेल्या सत्तांतराचा फटका या प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. पवार उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांनी आता या रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सिन्नर तालुक्यातील मोह ते वडझिरेपर्यंत एकूण १७ गावांचे मिळून १९७ हेक्टर खासगी क्षेत्र संपादित करावयाचे आहे. त्यापैकी केवळ ४५ हेक्टरवरील क्षेत्र थेट खरेदीने संपादित करण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित १५२हेक्टर क्षेत्रावर भूसंपादन प्रक्रिया राबवायची आहे. १२५भूधारकांना मोबदला रक्कम ५७ कोटी २६ लाख ९६ हजार इतकी देण्यात आली आहे.
नाशिकच्या या गावांत भूसंपादन -
नाशिक तालुक्यातील देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, संसारी, नाणेगाव या पाच गावांमध्ये एकूण १७२ गटांमधील खासगी क्षेत्राचे थेट भूसंपादन करण्यात येणार आहे. एकूण ४५ हेक्टर इतके हे क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्वाधिक १५.६८ हेक्टर क्षेत्र संसारी गावातील अधिग्रहित केले जाणार आहे. ४ गावांची संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित मौजे देवळाली गावाचे आरेखनातील क्षेत्रात बदल झाल्याने मोजणी प्रलंबित आहे.
मुंबईला उद्या होणारी बैठक रद्द -
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी (दि.९) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व अन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी दृकश्राव्य यंत्रणेद्वारे ऑनलाइन बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत.