बाजार समिती कर्मचाऱ्यांकडून ५७ लाखांची रोकड जप्त
By admin | Published: October 26, 2016 12:51 AM2016-10-26T00:51:57+5:302016-10-26T00:52:20+5:30
एसीबीची कारवाई : तीन कर्मचारी ताब्यात
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी जात असलेल्या कारमधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५७ लाखांहून अधिकची रोकड मंगळवारी (दि़ २५) सायंकाळच्या सुमारास जप्त केली़ बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती़ दरम्यान, बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची ही थकीत रक्कम असल्याची चर्चा असून, संशयितांमध्ये बाजार समितीच्या एका संचालकाच्या सचिवाचा समावेश असल्याने संशय व्यक्त केला जातो आहे़ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी तथा संचालकाचे सचिव विजय निकम, अरविंद जैन (लेखापाल), दिगंबर चिखले (लिपिक) हे तिघे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास स्विफ्ट डिझायर (एमएच १५ सीएम २१८०) कारमधून २७ लाखांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळच्या सुमारास एसीबीने सापळा रचून या तिघांना कारसह ताब्यात घेतले असता कारमध्ये ५७ लाखांची रोकड आढळून आली़ एसीबीने या तिघाही संशयिताना ताब्यात घेऊन म्हसरूळ पोलीस ठाण्यात आणले़ तसेच या तिघांचीही रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती़ (प्रतिनिधी) रक्कम नेमकी कशाची या तिघा कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली रक्कम ही कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम असल्याची चर्चा आहे़ दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना नावे ही रक्कम मिळाली होती़ त्यांच्याकडून या पूर्वीच बळजबरीने सह्या घेण्यात आल्याची चर्चा म्हसरूळ पोलीस ठाणे आवारात रात्री होती़ त्यामुळे कर्मचाऱ्यांकडे सापडलेली ही रक्कम नेमकी कशाची, कोणाची व कोणाकडे जात होती याचा उलगडा पोलीस तपासानंतर होणार आहे़