नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ५९ लाखांचा गंडा

By दिनेश पाठक | Published: July 5, 2024 08:01 PM2024-07-05T20:01:49+5:302024-07-05T20:01:57+5:30

- वृद्धाला जादा पैशांचे दाखविले आमिष; सलग दुसरी घटना

59 lakhs fraud in name of share trading in Nashik | नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ५९ लाखांचा गंडा

नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ५९ लाखांचा गंडा

नाशिक/दिनेश पाठक : शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडत अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात चार भामट्यांनी वृद्धास तब्बल ५९ लाखांचा ऑनलाइन गंडा घातला. सलग दुसऱ्या दिवशी शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार शहरात उघड झाला. बार्बरा ॲण्ड सॅम्युल (६३, रा. श्री गणेश व्हॅली, सिन्नर फाटा, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली. त्यांना ज्यो हम्बरो टुूवेल्थ मॅनेजमेंट या नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून ॲडमिनने तसेच इतरांनी वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून फिर्यादी यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चॅटिंग सुरू केली.

या सर्व आरोपींनी संगनमत करून सॅम्युल यांना एक लिंक पाठवून ऑनलाइन स्टॉक मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. २८ मार्च ते ११ जून २०२४ या कालावधीत फिर्यादी हे घरी असताना त्यांना पाठवलेल्या लिंकवरील ॲपद्वारे ट्रेडिंग करण्यास भाग पाडले व वेगवेगळ्या पद्धतीने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादी बार्बरा ॲण्ड सॅम्युल यांना भामट्यांनी थोडे पैसे गुंतविल्यानंतर जास्तीचे पैसे पाठविले. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन झाला. परिणामी बार्बरा यांनी पैसे जास्त मिळेल या आशेेने वारंवार पैसे गुंतविले.

वेगवेगळ्या खात्यांवर पाठविले पैसे
फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर शेअर मार्केटिंगसाठी पैसे वर्ग करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण ५८ लाख ५९ हजार ३१५ रुपये जमा केले. मात्र बरेच दिवस झाले तरी नफाही नाही आणि मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख करीत आहे.

 

Web Title: 59 lakhs fraud in name of share trading in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.