निमगावचे सहा ग्रा. पं. सदस्य अपात्र
By admin | Published: May 11, 2017 12:27 AM2017-05-11T00:27:18+5:302017-05-11T00:27:57+5:30
मालेगाव : निमगाव ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांकडे शौचालय नसल्याने त्यांचे सदस्यत्व अपात्र करण्याचा निकाल येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : तालुक्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांकडे शौचालय नसल्याने त्यांचे सदस्यत्व अपात्र करण्याचा निकाल येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
२०१५ मध्ये झालेल्या निमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भिला काळू हिरे, सरला तुषार जगताप, सुनंदा बंडू हिरे, सोनाली रवींद्र हिरे, बेबीबाई गुलाब ठाकरे, सविता मनोज अहिरे हे सदस्यपदी निवडून आले होते. निवडून आलेल्या सदस्यांनी ९० दिवसांच्या आत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावात त्यांच्याकडे शौचालय असल्याचा ठराव घेणे बंधनकारक होते; मात्र सदस्यांनी तसा ठराव घेतला नसल्याने अनिल अवचित हिरे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधिताचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.
त्यांची मागणी नामंजूर करण्यात आल्याने त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अपील केले होते. त्यानंतर प्रकरणाची फेरचौकशी करून ग्रामपंचायत सदस्यांनी ९० दिवसांच्या आत शौचालय वापरत असल्याचा ठराव आहे का, याबाबत न्यायालयीन निर्णय करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन शौचालय वापराबाबतचा ग्रामसभेचा ठराव दिला नसल्यामुळे वरील सहाही सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आल्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला. अर्जदाराच्या वतीने अॅड.
मंगेश हिरे यांनी कामकाज पाहिले.