नाशिकच्या ६ आयर्न मॅनचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:55+5:302021-09-23T04:17:55+5:30
नाशिक : जर्मनीत हँबुर्ग येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत सहा नाशिककरांनी मानाचा किताब पटकवल्याबद्दल या आयर्न मॅन ...
नाशिक : जर्मनीत हँबुर्ग येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत सहा नाशिककरांनी मानाचा किताब पटकवल्याबद्दल या आयर्न मॅन हिरोंचा यथोचित सन्मान सोहळा नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. आयर्न मॅन अरुण पालवे,डॉ. अरुण गचाले, डॉ. वैभव पाटील,नीलेश झवर, अनिकेत झवर व डॉ.देविका पाटील यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे आव्हान स्वीकारण्याचा प्रयास केल्याबद्दल डॉ. सुभाष पवार व नीता नारंग यांनादेखील सन्मानित करण्यात आले. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयर्नमॅन किताब पटकावण्यासाठी केलेली प्रचंड मेहनत, तयारी व स्पर्धेदरम्यान आलेले खडतर अनुभव ऐकण्याची संधी सायकलिस्टना मिळाली. तसेच संघटनेच्या वतीने झालेल्या अष्टविनायक सायकल यात्रेत सहभागी झालेल्या रायडर्सचा गौरव, सन्मानचिन्ह देऊन आयर्नमॅनच्या हस्ते करण्यात आला . ८५० कि.मी. अष्टविनायक प्रवास अवघ्या चार दिवसात करताना प्रचंड पाऊस, खराब रस्ता, कधी घाटाचे रस्ते या सर्वांचे आव्हान स्वीकारून पूर्ण केल्याबद्दल संजय पवार, राजेंद्र पाटील कोटमे, विशाल शेळके, हेमंत कुमार गोसावी, अनिल कुमार सुपे, विष्णू आडके, सचिन नरोटे, अनिल थेटे, रवींद्रनाथ मिश्र, मिलिंद इंगळे व कर्नल शिव मिश्रा यांना सन्मानित करण्यात आले. नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे सर यांनी नाशिक सायकलिस्टसच्या आगामी नवीन उपक्रमांची माहिती दिली व सर्व आयर्न मॅनचे विशेष अभिनंदन केले. लवकरच नाशिक शहर हे आयर्न मॅनचे शहर म्हणून ओळखले जाईल, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या सचिव डॉ. मनीषा रौंदळ यांनी तर आभार प्रदर्शन साधना दुसाने यांनी केले.