नाशिकमध्ये पोलीस पाटील पदाच्या ६०० जागांसाठी ६ हजार अर्ज
By Sandeep.bhalerao | Published: October 17, 2023 07:18 PM2023-10-17T19:18:48+5:302023-10-17T19:19:07+5:30
या उमेदवारांची परीक्षा येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात १६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
नाशिक : जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल रिक्त पदभरतीसाठी पोलीस पाटील पदाच्या ६६४ जागांसाठी एकूण ६ हजार ५० तर कोतवाल या पदाच्या १४६ जागांसाठी २ हजार ४८० अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांची परीक्षा येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात १६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
पोलीस पाटील पदाच्या रिक्त् जागा भरण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार जिल्ह्यात पोलीस पाटील तसेच कोतवाल पदासाठी भरती काढण्यात आली आहे. या जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने त्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
जिल्ह्यात पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमदेवारांनी संकतेस्थळास भेट देवून आपले परीक्षा प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस पाटील पदाची भरती केली जाणा असून त्यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षा दयावी लागणार आहे. नाशिक जिल्यात देखील नाशिक उपविभागीय कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या गावांमधील एकूण ६६४ पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
मालेगा, येवला, चांदवड, दिंडोरी, बागलाण, नाशिक, निफाड, कळवण आणि इगतपुरी या उपविभागांमध्ये पोलीस पाटील पदाची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांची ८० गुणांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे.
या दोन्ही परीक्षांमधील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेस १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच तोंडी परीक्षा घेण्यात येईल.