धार्मिकस्थळांवर भोंग्यांच्या वापराकरिता ६० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 01:47 AM2022-05-06T01:47:52+5:302022-05-06T01:48:23+5:30
: शहरातील विविध धार्मिकस्थळांकडून भोंग्यांच्या वापराकरिता आता पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे परवानगी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांना गुरुवारपर्यंत (दि.५) ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश मशिदींच्या विश्वस्तांकडून पहाटेच्या अजानची परवानगी मागण्यात आली होती. यामुळे ३९ अर्ज पोलिसांनी बाद ठरविले.
नाशिक : शहरातील विविध धार्मिकस्थळांकडून भोंग्यांच्या वापराकरिता आता पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे परवानगी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांना गुरुवारपर्यंत (दि.५) ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश मशिदींच्या विश्वस्तांकडून पहाटेच्या अजानची परवानगी मागण्यात आली होती. यामुळे ३९ अर्ज पोलिसांनी बाद ठरविले. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी पुन्हा उचलला आणि पहाटेपासून होणाऱ्या अजानवर आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पहाटेची अजान भोंग्यातून द्यावयाची नाही, असे ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले. भोंग्यातून अजान झाल्यास त्या मशिदींपुढे हनुमान चालिसा वाजविण्याचे आदेश त्यांनी दिले. यानुसार शहरात बुधवारी (दि.४) पहाटेपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ३० पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक केली होती. यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. काही पदाधिकारी हे फरार असून गुरुवारपर्यंत ३५ पदाधिकाऱ्यांना शहराबाहेर हद्पार करण्यात आले.
दरम्यान, शहरातील विविध मंदिरे, मशिदींसह अन्य धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांकडून पोलीस आयुक्तालयाकडे भोंग्यांच्या वापराबाबत परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केले जात आहे. विशेष शाखेकडे येणारे अर्ज विविध कागदपत्रांची पडताळणी करून मंजूर केले जात आहे.
---इन्फो--
शहरात एकूण ८६ मशिदींची नोंद
आतापर्यंत ६० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३९ अर्ज हे बाद ठरविण्यात आले आहेत. बहुतांश अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नव्हती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ८६ मशिदी असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. दरम्यान, मशिदींप्रमाणेच बहुसंख्य मंदिरांवरील भोंग्यांसाठीही पोलिसांची परवानगी घेतली गेलेेली नाही, असे आढळून आले आहे.