रिंगरोडची ६० टक्के कामे अद्याप अपूर्ण
By admin | Published: October 30, 2014 11:34 PM2014-10-30T23:34:02+5:302014-10-30T23:34:22+5:30
अनेक अडथळे : अधिकाऱ्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ची अपेक्षा
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाजत गाजत सुरू केलेल्या रिंगरोडच्या कामांना ब्रेक बसला आहे. अपुरा निधी आणि वृक्षप्रेमींचा विरोध यामुळे ही कामे आत्तापर्यंत जेमतेम ४० टक्के इतकीच पूर्ण झाली आहेत. आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर निधीचा प्रश्न सुटेल आणि त्यानंतर या कामांना गती मिळेल, अशी आस आता प्रशासन बाळगून आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अंतर्गत वळण मार्ग आणि बाह्य वळण मार्ग साकारले जात आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यात दर्शविलेले रिंगरोड तयार करण्यासाठी पालिकेला तब्बल २२ वर्षे लागली आहेत. ४६५ कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ही कामे त्वरित पूर्ण होतील असे सांगितले जात होते. शिवाय एका मार्गावरून शहराबाहेर पडण्यासाठी अवघ्या १५ मिनिटांचा कालावधी लागेल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र हे रस्ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
सदरचे अनेक रस्ते तयार करताना मुळातच भूसंपादनास अडथळे आले. त्यामुळे जनार्दनस्वामी मठामागील बाजू तसेच उंटवाडी ते सपना थिएटर तसेच जेहान सर्कल ते गंगापूर गाव अशा अनेक ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर दिंडोरीरोड, गंगापूररोडसारख्या ठिकाणी वृक्षतोडीस नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने हरकतींच्या सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वृक्षतोडीस मज्जाव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे निधीची चणचण हा गंभीर प्रश्न आहे. पालिकेकडे कोट्यवधी रुपयांची देयके थकल्याने रिंगरोडच्या कामांना गती मिळालेली नाही. दिवाळीत काही प्रमाणात ठेकेदारांना देयके मिळाली असली, तरी आता मुख्यत्वे केंद्र आणि राज्य शासनाकडून निधीची अपेक्षा आहे. केंद्राप्रमाणे राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर आता केंद्र शासन निधीचा विषय हाती घेईल असे सांगण्यात येत असून, त्यामुळे पालिकेला ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)